Mumbai-Agra Highway LPG Gas Tanker Leak नाशिक – मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील राहुड घाटात सोमवारी रात्री एलपीजी गॅसचा टँकर अपघातग्रस्त झाला. टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्यामुळे या महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली. खबरदारीचा उपाय म्हणून ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. गॅस गळतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गॅस गळती थांबविण्यासाठी बीपीसीएल कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मालेगाव महानगरपालिका, मनमाड व नांदगाव नगरपरिषदेसह एमएनजीएल यांची अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी बोलाविण्यातआले आहेत.
चांदवड तालुक्यातील राहुड घाटात सोमवारी रात्री साडेनऊ वाजता एलपीजी गॅसचा टँकर अपघातग्रस्त झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. दोन दिवसांपूर्वी या घाटात ट्रेलरचा अपघात झाला होता. ८० टन वजनी ट्रेलर हटविण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची आवश्यकता होती. ती उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यातच हा दुसरा अपघात झाला. सोमवारी रात्री राहुड घाटात उतारावर एलपीजी गॅसचा टँकर या अपघातग्रस्त ट्रेलरवर जाऊन धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. यावेळी समोरून येणारी मालमोटारही टँकरला धडकल्याचे सांगितले जाते. अपघातानंतर एलपीजी टँकरमधून गळती सुरू झाली. गॅसचा वास सर्वत्र पसरल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे सावट आहे. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी महामार्गावरील दोन्ही बाजुंची वाहतूक बंद करून ती अन्य मार्गाने वळविली.
बीपीसीएल कंपनीचा हा एलपीजी गॅसचा टँकर आहे. टँकरमधील गळतीची माहिती कंपनीला कळविल्यानंतर रात्री कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मंगळवारी सकाळी टँकरमधून गॅस गळती सुरू होती. त्यामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली नाही. या महामार्गावरील नाशिक-धुळे दरम्यान चांदवड तालुक्यात राहुड घाट आहे. तीव्र उतारामुळे या घाटात वारंवार अपघात होतात. काही महिन्यांपूर्वी उताराच्या रस्त्यावर ब्रेक निकामी होऊन मालमोटारीने तीन वाहनांना उडवले होते. या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर २० जण जखमी झाले होते.
महामार्गावरील वाहतूक वळवली
एलपीजी टँकर अपघातग्रस्त झाल्यामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णत ठप्प झाली आहे. ही वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. रात्रीपासून धुळ्याहून येणारी वाहतूक मनमाडमार्गे चांदवड आणि नाशिकहून धुळे, मध्यप्रदेशकडे जाणारी वाहतूक चांदवडवरून मनमाड-मालेगाव अशी वळविण्यात आल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.