धुळे – अवैध गौण खनिज प्रकरणी कारवाई केल्याने शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील तलाठीला मोटारसायकलने धडक देण्यापर्यंत समाजकंटकांची मजल गेली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली बेटावद (ता.शिंदखेडा) येथील अनिल वडार याच्यासह अन्य एकाविरुद्ध  नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे सजाचे ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी योगेश भिल (रा मुडावद,ता.शिंदखेडा) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटल्यानुसार ११ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेला नरडाणे ते बेटावद रस्त्यावरील वारूळ गावाच्या पुलाजवळ लोटन बाबा मंदिरासमोर ही घटना घडली. अवैध गौणखनिजाने भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत असतांना अनिल वडार आणि त्याच्या मोटारसायकलवर पाठीमागे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने वाद घातला.

मोटारसायकलने नरडाणा सजाचे तलाठी प्रफुल्ल मोरे यांना धडक दिली. शासकीय कामात अडथळा आणून दोन्ही संशयितांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली. यानंतर गौणखनिज भरलेले ट्रॅक्टर पळवून नेण्यास मदत करून ते घटना स्थळावरून फरार झाले. या तक्रारीवरुन नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  झाला आहे. महसूल अधिकारी कर्मचारी अवैध गौणखनिज वाहतूकीला आळा घालण्याचा प्रयत्न करीत असतांना धुळे जिल्ह्यात अनेकदा वाद झाले आहेत.

गौण खनिजाची बेकायदेशीर काढणी आणि वाहतूक करणारे मुजोर संशयित थेट सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कॉलर पकडणे आणि धक्काबुक्की करण्यासह शिवीगाळ करतात. यामुळे सरकारी यंत्रणेतील संबंधित अधिकारी-कर्मचारी बहुतेकवेळा यातून  घडणाऱ्या अप्रिय घटना टाळण्याचे प्रयत्न करतात. नरडाणा ते बेटावद रस्त्यावर घडलेली ही घटना त्याचेच एक उदाहरण आहे.

अवैधपणे गोण खनिज नेणे, कोणी कारवाईचा प्रयत्न केल्यास त्याला दमदाटी करणे, प्रसंगी त्यास मारण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होत आहेत. गौण खनिजाची अवैधपणे होणारी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेकडून केला जातो. परंतु, बऱ्याचवेळा एकट्या कर्मचाऱ्यास असे माफिया जुमानत नाहीत. त्यांना धमकी देत पळून जातात. त्यामुळे अशा व्यक्तींविरुध्द कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

संशयिताने त्याच्याकडील मोटारसायकलने प्रफुल्ल मोरे यांना धडक दिल्याचे तक्रारीत म्हटले असून धडक देणारा घटनास्थळावरून लगेच पसार झाला. बेकायदेशीरपणे गौण खनिज प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे. – निलेश मोरे ,प्रभारी पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे, नरडाणा)