लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असून गोळवलकर, सावरकरांचा नाही. शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मीयांना बरोबर घेऊन राज्य केले. आतापर्यंत चालत आलेली ही परंपरा तोडण्याचे काम सत्ताधारी भाजपकडून सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.
मंगळवारी दलवाई हे येथे काठे गल्लीतील वादग्रस्त धार्मिक स्थळास भेट देण्यासाठी आले होते. संबंधित ठिकाणी जाण्यापासून पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. काही वेळ गंगापूर पोलीस ठाण्यात बसवून नंतर सोडण्यात आले. यावेळी दलवाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाशिकमध्ये पुरातन धार्मिक स्थळावरील कारवाईचा प्रकार दुर्देवी असून जाणीवपूर्वक राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित धार्मिक स्थळाचा आक्षेपार्ह उल्लेख करणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आपण त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी जाणार होतो. पोलिसांनी प्रतिबंध केला. वादग्रस्त विधाने करणारे मंत्री, भाजप आमदारांवर पोलीस कारवाई करीत नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचा निषेध करुन वातावरण बिघडविणाऱ्या सर्व दोषींवर जाती-धर्म न पाहता कारवाईची मागणी त्यांनी केली.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना पालिकेने रात्रीतून कारवाईची इतकी घाई का केली, असा प्रश्नही दलवाई यांनी केला. धार्मिक स्थळाबाबत न्यायालय जो निर्णय देईल, तो आपणास मान्य असेल. न्याय व्यवस्थेविरोधात बोलणारा दुबे किंवा राज्यसभेचे सभापती आपण नाहीत, असा टोलाही त्यांनी भाजपला हाणला.