कर्जमाफी, कृषिमालास हमीभाव यासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारपासून पुकारण्यात आलेला संप यशस्वी करण्यासाठी किसान क्रांती समन्वकांनी कंबर कसली आहे. मध्यरात्रीपासून भाजीपाला, दूध व शेतात उत्पादित कोणताही माल शहरात जाऊ न देण्याचा निर्धार गावोगावी करण्यात आला आहे. महामार्गावर कृषिमालाची वाहतूक करताना एखादे वाहन आढळल्यास ते पेटविण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे.
कृषिमालास भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय करणारा शेतकरी अडचणीत सापडल्याची भावना सातत्याने व्यक्त होत आहे. नाशिकचा विचार करता कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला व तत्सम मालास उत्पादन खर्च भरून निघेल, इतपतही भाव मिळत नसल्याने शेती हा नुकसानीचा व्यवसाय ठरला. त्याच्या परिणामी, कर्जाचा डोंगर वाढत असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणदेखील वाढत असल्याकडे समन्वय समितीचे पदाधिकारी लक्ष वेधतात.
नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे पडलेले भाव, नापिकी, वीज भारनियमन आदींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याच्यासमोर कुटुंब कसे चालवावे, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न कसे करावे, आजारपणाला पैसा कुठून आणावा, कर्ज कसे फेडावे असे असंख्य प्रश्न उभे ठाकले आहेत.
उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने हा घटक द्रुष्टचक्रात गुरफटला आहे. कृषिमालाचे भाव कोसळले की, तात्कालिक स्वरूपाची आंदोलने होतात. वेगवेगळ्या मागण्यांसाठी आजवर कित्येकदा आंदोलने केली गेली. तथापि, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेरचा मार्ग म्हणून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा, शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर निवृत्तिवेतन आदी मागण्यांसाठी गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या संपाला सुरूवात होत आहे. बुधवारी ग्रामीण भागात सर्वत्र संपाच्या जनजागृतीसाठी बैठकांचे सत्र सुरू होते. कृषिमालाची वाहतूक करणारे टेम्पो, दुधाचे टँकर संबंधितांना संपाची माहिती देऊन वाहतूक बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली.
बागलाण, दिंडोरी, निफाड, चांदवड आदी ठिकाणी बैठका पार पडल्या. जिल्ह्यातील ९० टक्के गावांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक गावातील शेतकरी कृषिमाल बाहेर पाठविणार नाहीत. कोणी पाठविण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितासह वाहनधारकास समजावून सांगितले जाईल, असे समन्वय समितीने म्हटले आहे. शहरात माल जाऊ नये याची सर्वतोपरी दक्षता घेतली जाणार आहे. परराज्यातून येणारा कृषिमाल आधीच रोखण्याची तयारी केली गेली आहे. गावोगावी शेतकरी वर्ग आहे. आपापल्या भागातून कृषी मालाची वाहतूक होणार नाही याकडे नजर ठेवली जाईल.
संतापलेल्या काही शेतकऱ्यांनी संप काळात कृषी मालाची वाहतूक दृष्टिपथास पडल्यास त्या मोटारी जाळण्याचा इशारा दिला आहे. लासलगाव व परिसरातील कृषी दुकानदारही गुरुवारी आपली दुकाने बंद ठेवून संपाला पाठिंबा देणार आहेत.
भाजीपाल्यासाठी मोफत शीतगृह
शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कुटुंबातील अनेक घटक पुढे आले आहेत. त्या अंतर्गत पिंपळगाव बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप बनकर यांच्यासह अनेकांनी आपले शीतगृह शेतकऱ्यांसाठी खुले केले आहेत. संप काळात कृषिमालाचे नुकसान होऊ नये यासाठी मोफत स्वरुपात शेतकऱ्यांना भाजीपाला व तत्सम कृषिमाल ठेवता येईल.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन
शेतकरी वर्गाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभा आणि समृद्धीबाधित शेतकरी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकरी विरोधी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करावा, आठ तास मोफत वीज, मोफत ठिंबक सिंचन आदी मागण्या करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतर महाराष्ट्र राज्य किसान सभेने निर्मिलेल्या ‘समृद्धी कुणाची? शेतकऱ्यांची की सरकारची?’ या पुस्तिकेचे प्रकाशन सभेचे सरचिटणीस डॉ. भालचंद्र कानगो यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे करण्यात येणार आहे. शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन राजू देसले यांनी केले.