नाशिक – ज्या गोदावरीच्या काठावर पुढील दीड वर्षात सिंहस्थ कुंभमेळा भरणार आणि लाखो भाविक या ठिकाणी पवित्र स्नानाचा योग साधणार आहेत, त्या नदीचे पावित्र्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात आल्याची तक्रार मनसेने केली आहे. स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना गोदावरी नदी परिसरात घाणीचे साम्राज्य पाहून अक्षरश: किळस येते. नदीचे पवित्र पाणी दुर्गंधित झाले आहे. यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई आणि पुढील काळात नदीचे पावित्र्य जपले न गेल्यास जनआंदोलनाबरोबर न्यायालयीन लढा देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. नाशिक नगरीचे नाव उंचावण्यास गोदावरी नदीचे योगदान आहे. या नदीतून शेतीसह लाखो नागरिकांची तहान भागवली जाते. देशभरातील भाविकांची गोदावरी श्रध्दास्थान आहे. काही उद्योगांनी दूषित पाणी सोडून गोदावरीला अपवित्र केले असून सध्या गोदावरीसह तिच्या उपनद्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचा मु्द्दा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हेमंत कुलकर्णी यांच्यासमोर मांडला. गोदावरी, नंदिनी, वालदेवी, दारणा नद्यांच्या प्रदूषणासंदर्भात निवेदन दिले. ज्या पवित्र गोदावरीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले जाते, त्याच नदीचे पाणी आज पिण्यासाठी भीतीदायक ठरत आहे. दूषित पाण्याने जीवितास आणि शेती व्यवसायात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
जगभरातून भाविक गोदावरीत स्नानासाठी येतात. प्रदूषणामुळे नाशिकसह गोदावरी नदीचे नाव खराब होत असल्याकडे मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींनी लक्ष वेधले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी व्यापक कार्यक्रमांची आवश्यकता आहे. सर्व नद्यांचे लेखापरीक्षण करून कसूर असणारे उद्योग, संस्थांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा मनसेकडून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमधून प्रक्रिया न करता रसायनयुक्त, दुषित पाणी गोदावरी आणि तिच्या उपनद्यांमध्ये सोडले जाते. गोदावरी नदीकाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. यात काही पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे केंद्रातील पाण्यावर प्रक्रिया न करता गोदावरीत सोडले जाते, दूषित पाणी गोदावरीत सोडण्यास मनाई करावी. गंगापूर गाव ते नांदूर मध्यमेश्वरपर्यंत नदीत पसरलेल्या पाणवेली काढण्याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे, कंपन्यातील दूषित पाणी, गटारीचे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात सक्त मनाई करावी आणि औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना प्रक्रिया केंद्र उभारणे बंधनकारक करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित तपासणी करावी. दूषित पाणी पात्रात सोडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.