नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे नागपूर जिल्हा बँकेच्या धर्तीवर प्रशासक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची (एमएससीबँक) नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेती आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच देवळा तालुक्यातील विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कुबेर जाधव यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सहकार मंत्र्यांकडे केली आहे.

जाधव यांनी निवेदनात आपली भूमिका मांडली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (एनडीसीसीबँक) आर्थिक स्थिती अतिशय डोलायमान झाली आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. एनडीसीसी बँक एकेकाळी राज्यातील अग्रगण्य आणि मोठी बँक होती. परंतु, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणात अनुत्पादक मालमत्तेमुळे, शेतकऱ्यांना पीक कर्ज, मध्यम आणि दीर्घकालीन कृषी कर्ज देण्यासाठी आता बँकेला संघर्ष करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडे जावे लागत आहे. खासगी सावकार जास्त व्याजदर आकारतात. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या सापळ्यात अडकतात. आणि काही प्रकरणांमध्ये आत्महत्या देखील झाल्या आहेत.

शेतीतील कमी गुंतवणुकीमुळे उत्पन्न कमी मिळत आहे. ज्यामुळे पंतप्रधानांचे शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न भंग होत असल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रशासक म्हणून एमएससी बँकेची ज्याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली, त्याप्रमाणे एनडीसीसी बँकेवर प्रशासक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची (एमएससी बँक) नियुक्ती करण्याची गरज आहे. एमएससी बँक आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याने एनडीसीसी बँकेला पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा बँकेचे त्यामुळे पुनरुज्जीवन होऊन जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा परवडणारे कर्ज मिळवू शकतात, ज्यामुळे कृषी उत्पादकता आणि उत्पन्नात सुधारणा होईल, असा आशवाद जाधव यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. एनडीसीसी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी एमएससी बँक एक व्यापक ब्लूप्रिंट तयार करेल, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू करण्यात यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.