नाशिक – संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून भ्रमणध्वनीकडे बघितले जाते. माहितीची देवाणघेवाण या माध्यमातून जलदगतीने होत असतांना राज्यातील काही गावे प्रशासकीय अनास्थेमुळे या सुविधेपासून वंचित आहेत. सुरगाणा तालुक्यातील चिंचपाडा येथील भारतीय दूरसंचार निगम अर्थात बीएसएनएलचा मनोरा बंद असल्याने ग्रामस्थांना भ्रमणध्वनी नेटवर्कसाठी डोंगर वा झाडांवर चढून गुजरात राज्यातील नेटवर्कवर अवलंबून रहावे लागत आहे.
सुरगाणा हा आदिवासी बहुल भाग. या ठिकाणी आजही हंडाभर पाण्यासाठी, रस्त्यासाठी तसेच आरोग्य सेवेसाठी सरकार दरबारी झगडावे लागते. यास प्रशासकीय अनास्था कारणीभूत असली तरी भौगोलिक अडचणी मोठ्या प्रमाणावर आहे. सुरगाणा तालुक्यातील लहान-मोठ्या गावांना भ्रमणध्वनी नेटवर्कची समस्या भेडसावत आहे.
श्रीभुवन पैकी चिंचपाडा गावाची लोकसंख्या २०० हून अधिक आहे. कामानिमित्त, शिक्षणासाठी सुरगाण्यासह जवळील पेठ, हरसूल या ठिकाणी त्यांना ये-जा करावी लागते. या भागात भ्रमणध्वनीचा मनोरा आहे, परंतु, काही केल्या संपर्क साधता येत नाही. कारण मागील वर्षभरापासून बीएसएनएलचा मनोरा बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. गुजरातला लागून असणारा हा महाराष्ट्रातील भाग आहे. सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन, मोठामाळ, चिंचपाडा, मोठीचा गावठा, बाळओझर, बर्डा डोंगराच्या कुशीतील गावातील ग्रामस्थ नेटवर्कसाठी डोंगर, झाडांचा आधार घेऊन गुजरात राज्यातील भ्रमणध्वनी नेटवर्कसाठी अवलंबून आहेत.
यात भागातील छोट्या-मोठ्या गावांतील तीन ते चार हजार ग्रामस्थांचा समावेश आहे. श्रीभुवनची एक हजार, मोठामाळ १२००, चिंचपाडा ४५०, बर्डा २५०, मोठीचागावठा १५० , बाळओझर २५० असे तब्बल साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या गावांना भ्रमणध्वनी नेटवर्कअभावी गुजरातसह आणि महाराष्ट्रातील अन्य गावांच्या नेटवर्कवर अवलंबून रहावे लागते. चिंचपाडा गावात भ्रमणध्वनीचा मनोरा उभा असून तो लवकर सुरु होणे ग्रामस्थ, शाळा, विद्यार्थी यांच्यासाठी महत्वाचे आहे. विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ यांना ऑनलाईन कामे करण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याशिवाय पर्याय रहात नाही. सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांत अनेक ठिकाणी भ्रमणध्वनी नेटवर्क मिळत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नेटवर्क मिळवण्यासाठी काही तरुण चक्क उंच झाडांचा आधार घेतात ,असे दिसून येते. केंद्र सरकारच्या अखत्यारीत बीएसएनएलचे नेटवर्क शहरातही उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागात, त्यापेक्षा बिकट स्थिती आहे. त्यामुळे अडचणी येत आहे. या गावाची ऑनलाईन कामे, वैदयकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी चिंचपाडा (श्रीभुवन) भ्रमणध्वनी मनोरा लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी परिसरातील सर्व ग्रामस्थ यांनी केली आहे