धुळे : संभाव्य धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑटोस्विच ऐवजी कॅपॅसिटर बसवावेत, असे आवाहन महावितरणच्या व्यवस्थापनाने केले आहे.बहुतेक शेतकऱ्यांनी कृषिपंप तत्काळ सुरू करण्यासाठी ऑटोस्विच बसवण्याची पद्धत अवलंबली आहे. मात्र, त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो आणि रोहित्र जळणे, वीजवाहिन्या नादुरुस्त होणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. या समस्येमुळे केवळ महावितरणलाच नव्हे, तर शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागते आहे. अशा तांत्रिक अडचण उद्भवणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी आणि योग्य दाबाचा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवावेत, असे आवाहन महावितरणच्या व्यवस्थापनाने केले आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवणे हा रोहित्र जळणे आणि तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी प्रभावी उपाय आहे. कॅपॅसिटर बसवल्यामुळे कमी दाबाचा वीजपुरवठा सुधरतो, वीजवाहिन्या ओव्हरलोड होत नाहीत तसेच रोहित्राचे आयुष्य वाढते. याशिवाय वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता कमी होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी अद्याप त्यांच्या कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविलेले नाहीत, आणि काहींनी बसविल्यानंतरही थेट जोडणी केली आहे किंवा उपकरण बंद ठेवले आहे. त्यामुळे ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते तातडीने बसवून घ्यावेत, तसेच बंद किंवा चुकीच्या जोडणीचे कॅपॅसिटर दुरुस्त करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. कॅपॅसिटर बसवल्याने कृषिपंपांचे नुकसान टळते, विद्युत केबल जळण्याचे प्रमाण घटते, योग्य विद्युतदाब राखला जातो, वीज वापरात बचत होते आणि केव्हीए मागणी कमी होते. हे उपकरण ऊर्जेचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करते.

महावितरणच्या माहितीनुसार, कृषिपंपांना दिवसा आणि रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो. वीजपुरवठा सुरू झाल्यावर शेतात जाऊन कृषिपंप सुरू करण्याचा त्रास टाळण्यासाठी काही शेतकरी ऑटोस्विच लावतात. पण वीज येताच सर्व पंप एकाच वेळी सुरू झाल्याने रोहित्रावरील भार प्रचंड वाढतो आणि परिणामी रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रकार घडतात. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास वीजपुरवठा खंडित होऊन शेतकऱ्यांचे सिंचन थांबते, पिकांची हानी होते आणि उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या कृषिपंपांना ऑटोस्विचचा वापर न करता अनिवार्यपणे कॅपॅसिटर बसवावेत. या उपायामुळे वीजपुरवठा सुरळीत राहील, उपकरणांचे आयुष्य वाढेल आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल.

शेतकऱ्यांनी ऑटोस्विचचा वापर न करता अनिवार्यपणे कॅपॅसिटर बसविले,तर रोहित्र जळणे व वीजवाहिन्यांचे बिघाड टाळता येईल.वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबात ठेवणे आणि आपसूकच कृषिपंपांचे आयुष्य वाढवणे शक्य होईल.ऊर्जेचा कार्यक्षम वापर आणि वीज बचत करता येईल. यामुळे शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणे शक्य होईल. महावितरणच्या या उपक्रमामुळे कृषिक्षेत्रात सुरक्षित, स्थिर आणि ऊर्जा बचतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.