जळगाव : शहरात महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद दिवाळी महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. त्याद्वारे फराळासह विविध शोभेच्या वस्तुंच्या विक्रीतून सुमारे एक कोटी १८ लाख रूपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली.
सगळीकडे दिवाळीच्या सणाची लगबग राज्यभरात सुरू असताना, बचत गटांच्या उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ तसेच ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याचा उद्देश महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून जोपासण्यात आला. नागरिकांना अस्सल चवीचे पदार्थ आणि दर्जेदार वस्तुंच्या खरेदीची संधी देणाऱ्या उमेद दिवाळी महोत्सवाचे आयोजन शहरातील शिवतीर्थ मैदानावर करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ते एक महत्त्वाचे पाऊल ठरले. दिवाळी महोत्सव या विशेष उपक्रमाचे संपूर्ण राज्यात आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा होता. अनेकदा चांगल्या वस्तू व खाद्य पदार्थ बनवून देखील योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच अडचण ओळखून उमेद अभियानाने दिवाळी महोत्सव उपक्रमाचा हाती घेतला. ज्यामुळे महिलांना मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांपर्यंत फराळासह वस्तू पोहोचविणे शक्य झाले.
दिवाळी महोत्सवातील सर्वच विक्री दालनांमध्ये दिवाळीसाठी आवश्यक असणारे पदार्थ आणि वस्तू उपलब्ध करून दिल्या होत्या. ज्यामध्ये महिलांनी स्वतःच्या हाताने बनविलेले फराळाचे पदार्थ, सुकामेवा, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले तेल, हातसडीचा तांदूळ, विविध प्रकारचे घरगुती मसाले, आकर्षक आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या, विविध प्रकारच्या अगरबत्ती, दैनंदिन गरजेच्या वस्तू, पुजेचे साहित्य, जूट आणि कापडी बॅग यांचा समावेश होता. एकंदरीत दिवाळी महोत्सव केवळ प्रदर्शन नाही तर सामाजिक आणि आर्थिक चळवळ बनला. त्यास जिल्हाभरातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महोत्सवातून एक कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेची आर्थिक उलाढाल झाली. परिणामी, ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वृद्धींगत झाला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
महिला बचत गटांसाठी आयोजित उमेद दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई, तालुका अभियान व्यवस्थापक रविंद्र सुर्यवंशी यांचीही उपस्थित होती. उमेद अभियानाच्या दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना केवळ आर्थिक उत्पन्न मिळणार नाही, तर त्यांच्यात आत्मविश्वासाचाही दिवा प्रज्वलित होईल, असे पालकमंत्री पाटील म्हणाले होते.
