मालेगाव : वाढीव परतावा देण्याच्या आमिषाने भामट्यांकडून आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना नित्याच्या झाल्या असताना त्यातून लोक काही धडा घेताना दिसत नाही. अशिक्षित समाज अशा प्रकारांना भुलला तर, एकवेळ समजून घेता येईल, पण सुशिक्षित म्हणवून घेणारे लोकच जर अशा आमिषांना बळी पडत असतील तर ती खरोखर चिंताजनक बाब म्हणावी लागेल. कोल्हापूरच्या सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालकाला मालेगाव तालुका हद्दीत एका टोळीकडून अशाच प्रकारे गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे. दुप्पट पैसे आणि अडीच पट सोने मिळण्याच्या लालसेपोटी केंद्रसंचालक व त्याच्या मित्रांची नऊ लाख ३५ हजाराची फसवणूक झाली आहे.

उच्चशिक्षित व्यक्तींनी भामट्यांच्या जाळ्यात अडकण्याच्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. महेश बोरनाक (४३, बामणे तालुका भुदरगड, कोल्हापूर) यांच्या तक्रारीवरून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बोरनाक हे बामणे येथील न्यू शौर्य नावाच्या सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक आहेत. दोन वर्षांपूर्वी सूरज गुंजाळ (२३, कोळपाडे, संगमनेर, अहिल्यानगर) हा तरुण या केंद्रात प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता. नंतर सूरज गावी परतला परंतु, बोरनाक व त्याच्यात भ्रमणध्वनीद्वारे संपर्क कायम राहिला.

गेल्या ११ ऑगस्ट रोजी सूरज याने बोरनाक यांचेशी असाच संपर्क साधून धुळे जिल्ह्यातील आपल्या संपर्कातील काही लोक भारतीय चलनातील नोटा दुप्पट करून देतात, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून बोरनाक यांनी आपले मित्र शाहीर बाळासाहेब धनगर व अक्षय गोरूले यांना त्याविषयी माहिती दिली. या दोघांनाही हा प्रकार खरा वाटला.

दुप्पट रकमेच्या आमिषाला बळी पडून बोरनाक यांच्याकडील सव्वा लाख व गोरुले यांच्याकडील एक लाख असे एकूण सव्वा दोन लाख रुपये घेऊन सुरजने सांगितल्यानुसार गेल्या१३ ऑगस्टला भल्या सकाळी तिघांनी मोटारीने नंदुरबार गाठले. यानंतर सूरज याने पाठविलेल्या व्हॉट्सॲप लोकेशननुसार ते पुन्हा धुळे जिल्ह्यातील अजनाळे गावाजवळ पोहोचले. तिथे दुचाकीवर आलेल्या दोघा तरुणांनी त्यांना काही अंतरावर मोटार नेण्यास सांगितले. त्या ठिकाणी दुचाकीवर आणखी काही जण आले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान आम्ही आजवर किती लोकांना दुप्पट पैसे करून दिले याच्या कथा या तरुणांनी ऐकवल्या.

त्यानंतर बोरनाक यांनी त्यांच्याकडे सव्वा दोन लाखाची रक्कम सुपूर्द केली. ही रक्कम फार कमी आहे आणि जर जास्त रक्कम असती तर लवकरात लवकर रक्कम दुप्पट करता आली असती, असे या तरुणांनी त्यांच्या गळी उतरविले. तेव्हा अंगावरील सोने दिले तर चालेल का, अशी विचारणा केल्यावर सोने असेल तर, अडीच पट परतावा मिळेल, असे या तरुणांनी पटवून दिले.

यानंतर लालसेपोटी बोरनाक यांच्या अंगावरील ५५ ग्रॅम सोन्याची चेन व धनगर यांच्याकडील १६ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा सात लाख १० हजाराचा सुवर्ण ऐवज देखील त्यांनी या तरुणांच्या हातात ठेवला. रोख रक्कम व पाठोपाठ सोन्याच्या वस्तू हातात पडताच क्षणी हे तरुण तेथून सटकले. त्यानंतर काही दिवस वाट बघितल्यानंतरही सांगितल्याप्रमाणे परतावा मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याची बोरनाक व त्यांच्या मित्रांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाणे गाठून सूरज तसेच अन्य भामट्यांविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल करून तपासाची चक्रे फिरवली असता अजनाळे येथील शुभम भोसले या संशयिताला अटक करण्यात यश आले. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अजनाळे गावी अशाप्रकारे लोकांची फसवणूक करणारी एक टोळीच अस्तित्वात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीतील अन्य साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. उपनिरीक्षक दामोदर काळे हे अधिक तपास करीत आहेत.