मालेगाव : गोरक्षकांकडून त्रास दिला जात असल्याची ओरड करत कुरेशी समाजातर्फे सध्या राज्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. यात शेतकरी भरडला जात असल्याचे म्हणत माजी कृषिमंत्री व सत्ताधारी महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांच्या विरोधात ताठर भूमिका घेतली आहे. या विषयावरून खोत व गोरक्षकांमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी गोशाळांच्या कारभारावर संशय व्यक्त करणारे विधान केले आहे. महाराष्ट्रातील सर्व गोशाळांमधील जनावरांचे विशेष लेखा परीक्षण केल्यास मोठा घोटाळा बाहेर येईल, असा दावा शेख यांनी केला आहे.

मालेगाव तालुक्यातील सातमाने येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलताना खोत यांनी गोरक्षकांना लक्ष्य केले होते. गोरक्षणाच्या नावाने राज्यात गुंडागर्दी सुरू आहे, असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. त्यांच्या या वक्तव्याचा मालेगाव येथे गोरक्षकांकडून निषेध नोंदविण्यात आला. गोरक्षकांची ‘गब्बर’ अर्थात डाकू अशी संबोधना करणाऱ्या खोत यांचा ‘सद्दाम खोत’ असा उल्लेख आंदोलकांनी केला.

सत्ताधाऱ्यांनी खोत यांना आवर घालावा, अन्यथा आगामी काळात धडा शिकविण्यात येईल, अशी भाषा आंदोलकांकडून वापरण्यात आली. या वादात आसिफ शेख यांनी खोत यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. खोत हे शेतकरी नेते असल्याने शेतकऱ्यांची दुःखे काय असतात, याची त्यांना जाणीव आहे, असे ते म्हणाले. या प्रश्नावर खोत यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन उभे केल्यास या आंदोलनाला आपण भक्कमपणे पाठिंबा देऊ, असेही त्यांनी सांगितले.

गोरक्षणाच्या नावाने त्रास देण्याचे उद्योग केले जात आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे आणि विशिष्ट लोकांना लक्ष्य करण्याचे राजकारण त्याद्वारे केले जात आहे. तसेच गोरक्षण करणे, हा धंदा झाला असल्याची टीका देखील शेख यांनी केली. गोरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही जणांची पूर्वी सायकल घेण्याची ऐपत नव्हती, ते लोक आता अचानक मालामाल कसे झाले, असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला.

गोवंश प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांकडून पकडण्यात आलेल्या जनावरांची रवानगी गोशाळांमध्ये करण्यात येते. मात्र नंतर या जनावरांचे पुढे काय, होते याची तपासणी करण्याची सहसा कुणी तसदी घेत नाही. पोलीस दप्तरातील नोंदीनुसार राज्यातील सर्व गोशाळांमध्ये आतापर्यंत पकडलेली किती जनावरे दाखल करण्यात आली, त्यापैकी किती जनावरे प्रत्यक्षात तेथे अस्तित्वात आहेत व अन्य जनावरांचे काय झाले याची शहानिशा केली तर मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे उघडकीस येईल, असा दावा शेख यांनी केला. त्यासाठी पोलीस दलाला सोबत घेऊन संपूर्ण राज्यातील नोंदणीकृत व बिगर नोंदणीकृत अशा गोशाळांचे विशेष लेखापरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

पशुधनाची विक्री का होते ?

शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री का केली जाते, याच्या मुळाशी गेल्यास सदाभाऊ खोत यांच्या म्हणण्यात तथ्य दिसते, अशी प्रतिक्रिया आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निमंत्रक निखिल पवार यांनी दिली आहे. शासनाने गोशाळांना अनुदान देण्यापेक्षा शेतकऱ्यांनाच पशुपालनासाठी अनुदान दिले तर, शेतकरी जनावरेच विक्री करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार अस्तित्वात आहे. अशावेळी शहरात कत्तलखाने कसे निर्माण होऊ दिले जातात, यावरही पवार यांनी बोट ठेवले.