प्रल्हाद बोरसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव : येथील माजी आमदार, महापौर आणि २७ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसला आपलेसे केले. घाऊक पद्धतीच्या या पक्षांतरामुळे प्रदीर्घ काळ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मालेगावात काँग्रेस रसातळाला गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तगडे पाठबळ लाभल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला घबाडयोग प्राप्त झाल्यासारखे चित्र आहे. राजकीयदृष्टय़ा मालेगावचे महत्त्व लक्षात घेता आपल्या पक्षाचा जनाधार वाढावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. त्याचाच भाग म्हणून २०१४ मध्ये तत्कालीन अपक्ष आमदार मौलाना मुफ्ती यांना राष्ट्रवादीने पक्षात घेत विधानसभा निवडणुकीत उतरविले, परंतु मौलाना यांना तेव्हा सपाटून मार खावा लागला. त्यातच गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मौलाना यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत एमआयएमचा रस्ता धरला. महापालिकेत राष्ट्रवादीचे २० नगरसेवक आहेत. त्यांपैकी तिघा-चौघांचा अपवाद वगळता अन्य नगरसेवकही मौलानांच्याच वळचणीला गेल्याचे दिसून आले. या सर्व पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपूर्वी माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेसचा त्याग करत राष्ट्रवादीचे घडय़ाळ बांधले.

आसिफ शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे पिता विद्यमान नगरसेवक आणि माजी आमदार शेख रशीद तसेच त्यांच्या समर्थकांनीही काँग्रेसला दूषणे देत पक्षत्याग करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच पुत्रापाठोपाठ तेही राष्ट्रवादी प्रवेश करतील, हेही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले होते. केवळ किती नगरसेवक व समर्थक त्यांची साथ करतील, एवढीच काय ती उत्सुकता शिल्लक होती. शेख हे स्वत: नगरसेवक आणि पत्नी ताहेरा या विद्यमान महापौर आहेत. महापालिकेत काँग्रेसचे ३० नगरसेवक होते. एका सदस्याचे निधन झाले असून दुसरे एक नगरसेवक वगळता अन्य सर्व २८ नगरसेवकांनी आता राष्ट्रवादीचा पर्याय निवडल्याने हा पक्ष शहरातील ताकदवान पक्ष झाला आहे.

अशा तऱ्हेने मोठय़ा प्रमाणावर झालेल्या पक्षांतरामुळे शहरात काँग्रेसची अवस्था अत्यंत केविलवाणी झाल्याचे चित्र आहे. दुबळय़ा झालेल्या काँग्रेसचे नेतृत्व सांभाळण्यासाठी शहरातील एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या शोधात पक्षाचे वरिष्ठ नेते होते. त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक एजाज बेग हे काँग्रेसच्या गळाला लागले. दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. या वेळी त्यांचे काही समर्थकही हजर होते. एकंदरीत राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या स्थानिक पातळीवरील चढाओढीत राष्ट्रवादी वरचढ ठरल्याचे स्पष्ट झाले असून आगामी महापालिका निवडणुकीत कोणता पक्ष काय भूमिका घेईल, हे बघणे मोठे रंजक ठरणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malegaon congress lost ncp benefited ysh
First published on: 29-01-2022 at 00:02 IST