मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून येथील सामान्य रुग्णालय तसेच जिल्हाभरातील विविध उपजिल्हा रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे आवश्यक औषधे बाहेरून खरेदी करण्याची पाळी येत असल्याने गरीब रुग्णांची हेळसांड होत आहे. यासंदर्भात निर्माण झालेल्या तीव्र जनभावना तसेच राजकीय पक्षांकडून आंदोलनात्मक मार्ग अनुसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हा नियोजन समितीने ७ कोटी २५ लाखांचा निधी त्यासाठी मंजूर केल्याने सरकारी रुग्णालयांमधील औषध तुटवड्याची समस्या आता मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून मालेगावच्या सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांचा साठा संपुष्टात आला आहे. तेथील औषध तुटवड्यामुळे रुग्णालयांमधील उपचार सेवेला मोठा फटका बसला आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आवश्यक औषधे बाहेरून खरेदी करावी लागत आहे. त्याचा आर्थिक भार विशेषतः गरीब व गरजू रुग्णांना पेलणे अवघड झाले आहे. औषध तुटवड्याच्या समस्येने परवड होत असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी येथील सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ नुकतेच आंदोलन केले होते. आंदोलकांनी तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश पाटील यांना या संदर्भात जाबही विचारला होता. परंतु या परिस्थितीत कुठलाही फरक पडला नाही. तेव्हा औषधसाठा खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का, असा सवाल करत समाजवादी पार्टीतर्फे गुरुवारी मालेगाव येथे सरकारला पैसे देण्यासाठी ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव व एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनाही या विषयावरून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी शनिवारी तातडीने मालेगावला भेट देऊन सामान्य रुग्णालयात बैठक घेतली. बैठकीत रुग्णालयातील औषध तुटवड्याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून आपण जिल्हाधिकारी, आरोग्य उपसंचालक व मंत्रालयात पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीकडून ७ कोटी २५ लाखांचा निधी औषध साहित्य व साधन सामुग्री खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली.
या बैठकीत औषध पुरवठा व्यवस्थापन, साठा नियंत्रण तसेच सेवासुविधा अधिक परिणामकारक करण्याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली. या निधीच्या मंजुरीमुळे सोमवारपासून खरेदी सुरू करता येणार असल्याने लवकरच रुग्णालयांमधील आवश्यक औषधांचा पुरवठा नियमित होईल. तसेच साठा उपलब्धतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचेही नियोजन सुरू असल्याची माहिती बच्छाव यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीमुळे मालेगाव शहर व परिसरातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा दावा देखील त्यांनी केला. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांना पाठवलेल्या ३१ ऑक्टोबर रोजीच्या पत्रांनुसार औषध साठा खरेदी करण्यासाठी निधी मंजूर झाल्याचे दिसून येत आहे. तेव्हा या विषयावरून इतके दिवस जी ओरड होत होती, त्याकडे लक्ष देण्यास जिल्हा प्रशासनाला वेळ नव्हता का, असा प्रश्न उपस्थित होत केला जात आहे. तसेच हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका जिल्हा प्रशासनावर होत आहे.
