मालेगाव : गोरक्षकांची ‘गब्बर’ अर्थात डाकू म्हणून संबोधना केल्यामुळे आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात मालेगावात तीव्र पडसाद उमटले आहेत. संतप्त गोरक्षकांनी खोत यांच्या निषेधार्थ आंदोलन करत थेट सत्ताधारी भाजपालाच यानिमित्ताने इशारा दिला. खोत यांची वक्तव्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गोरक्षकांचा अवमान करणारी असल्याने त्यांना आवर घालावा, अन्यथा सत्ता उलथवून टाकण्यासाठी हेच कार्यकर्ते मोठी भूमिका निभावतील, अशी भावना आंदोलकांनी बोलून दाखवली.

गेल्या १४ जून पासून महाराष्ट्रातील खाटीक समाजातर्फे बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीला त्यांचा विरोध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु जनावरांची नियमानुसार वाहतूक करताना काही तथाकथित गोरक्षकांकडून त्रास दिला जातो, असा आक्षेप घेत या समाजातील व्यापाऱ्यांनी जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले आहेत. या आंदोलनाचा शेतकरी वर्गाला आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचा सूर लावत सदाभाऊ खोत यांनी या वादात उडी घेतली. गोवंश रक्षणाच्या नावाने काहीजण खंडणी उकळतात, असा आरोप त्यांनी अलीकडेच केला होता.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सातमाने येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी खोत यांनी पुन्हा एकदा गोरक्षकांना लक्ष्य केले. आजकाल गोरक्षण हा व्यवसाय झाला आहे, अशी टीका त्यांनी केली. आमच्या गाईंचे चारापाणी आणि शेणमुत तुम्ही करता का, असा सवाल करत तुम्हाला आमच्या गाईंचे रक्षण करण्याचा अधिकार कोणी दिला, अशी विचारणा खोत यांनी गोरक्षकांना केली.

गोरक्षकांची ‘गब्बर’ अशी संबोधनाही त्यांनी केली. शेतकऱ्यांना बरोबर घेऊन ही ‘गब्बरसिंग’ व्यवस्था मोडून काढू, अशी वादग्रस्त भाषा देखील त्यांनी वापरली. या वक्तव्यामुळे शहर व तालुक्यातील गोरक्षक तसेच हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. त्यामुळे आक्रमक झालेले गोरक्षक व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खोत यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. गोरक्षकांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या खोत यांच्या विरोधात शासनाने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आंदोलकांच्या वतीने देण्यात आले.

यावेळी खोत यांचा ‘सद्दाम खोत’ म्हणून उल्लेख करत ते विषारी साप आहेत, अशी जहरी टीका आंदोलकांकडून केली गेली. भाजपच्या कोट्यातून खोत यांनी विधान परिषदेवर आमदारकी मिळवली असताना हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात ते कशी भूमिका घेऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित करत भाजपनेच त्यांना आवर घालावा, असा सल्ला आंदोलकांनी दिला.

खोत यांनी गोरक्षकांची माफी मागावी तसेच राज्य शासनाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा महाराष्ट्रातील गोरक्षक मुंबईपर्यंत पायी यात्रा काढून ताकद दाखवून देतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात जगदीश गोऱ्हे, डॉ चैतन्य देवरे, राहुल बच्छाव, योगेश गवळी, डॉ संतोष पाटील, ललित गोरस, देवा पाटील, बंटी शेलार, विलास जगताप, पवन वडनेरे, आनंद माळी, कैलास केसकर, भरत सूर्यवंशी,रवी कासार, गौरव शार्दुल, मयूर पाटील, विनोद निकम, योगेश देसले, नीलेश सोनवणे आदी सामील झाले होते.