मालेगाव : गेल्या काही दिवसात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग आणि त्यातून उद्भवणारी दुर्गंधी यामुळे स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला असून त्यामुळे शहरातील रोगराईत वाढ झाल्याची तक्रार आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने केली आहे. समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी यासंदर्भात महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा,असा आग्रह यावेळी समितीतर्फे धरण्यात आला.

शहरातील कचरा संकलनाचे काम नीट होत नसल्याने हे काम करणाऱ्या आधीच्या ठेकेदाराविरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठेक्याची मुदत संपल्यानंतर महापालिकेतर्फे कचरा संकलनासाठी नवा ठेकेदार नियुक्त करण्यात आला. आधी असणाऱ्या ठेक्याच्या तुलनेत नव्या ठेकेदाराला जवळपास दुप्पट दराने हे काम देण्यात आले आहे. मात्र कचरा संकलनाचे काम पूर्वीपेक्षा अधिक खराब होत असून सर्वत्र कचराकोंडी झाल्याचे शहरातील चित्र आहे.

त्यामुळे या कामासाठींचे देयके अदा करताना महापालिकेची तिजोरी नुसती खाली होत आहे, परंतु खऱ्या अर्थाने स्वच्छता होत नाही, यावर शिष्टमंडळाने बोट ठेवले. तसेच नव्याने ठेका देतेवेळी सिंगापूरच्या धर्तीवर मालेगाव शहराची स्वच्छता केली जाईल,अशी हमी दिली जात होती. प्रत्यक्षात शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गहण होत असल्याने सिंगापूरच्या नावाने केवळ वल्गना केल्या का,असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

स्वच्छतेचे काम नीटनेटकेपणाने व्हावे यासाठी घंटागाड्या व मनुष्यबळ वाढवण्यात यावे, त्यावर देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आदी मागण्या समितीतर्फे करण्यात आल्या. अस्वच्छतेमुळे पसरलेल्या रोगराईमुळे शहरवासीय त्रस्त झाले असल्याने त्यासंदर्भात महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात,असा आग्रह देखील यावेळी धरण्यात आला. मोकाट गायीच्या हल्ल्यानंतर सोयगाव नववसाहत भागातील सुनंदा अहिरे या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबद्दल समितीने महापालिका प्रशासनाला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे ही पालिकेची जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित पार पाडली जात नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे यापूर्वी मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्या व काही लोकांना जखमीही व्हावे लागले होते. आता तर महिलेला जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत मयत सुनंदा अहिरे यांच्या वारसांना महापालिकेतर्फे किमान दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी समितीतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली.

शिष्टमंडळात निखिल पवार, विवेक वारुळे, गुलाब पगारे , भरत पाटील, प्रवीण चौधरी, दीपक पाटील, कैलास शर्मा, तुषार पाटील, अर्जुन भाटी, गोपाळ सोनवणे, सुशांत कुलकर्णी, किशोर गढरी, विकी पाटील, सनी जगताप, अनिल जाधव, निलेश पाटील, प्रवीण जाधव आदींचा समावेश होता.