मालेगाव : कळवण,सटाणा,मालेगाव, नांदगाव व देवळा भागात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. विशेषत: कांद्याचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणावर मर रोगाला बळी पडत आहेत. अवकाळी संकटामुळे कांद्याची रोपे ‘होत्याची नव्हती’ अशी गत होत असल्याने बियाण्यांवर केलेला खर्च पाण्यात जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
अतिवृष्टीनंतर मालेगाव व आसपासच्या तालुक्यांमध्ये आता अवकाळी पावसाचे संकट कोसळले आहे. गेल्या तीन दिवसात या भागात अवकाळीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आताच्या अवकाळीमुळे उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा विहिरींना चांगले पाणी असल्याने लेट खरीप व उन्हाळी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. त्यासाठी सध्या रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. या पावसामुळे कांद्याच्या रोपांचे सर्वच्या सर्व क्षेत्र मर रोगामुळे खराब होत असल्याची प्रचिती बहुसंख्य शेतकऱ्यांना येत आहे. या रोपांबरोबरच लागवड केलेली कांद्याचे पीक खराब होत आहे. शिवाय काढणीला आलेला मका,बाजरी यासारख्या पिकांचेही अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डाळिंब पिकालाही अवकाळीचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहे.
बागलाण तालुक्यात झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची आमदार दिलीप बोरसे, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान व तहसीलदार कैलास चावरे यांनी सोमवारी संयुक्त पाहणी केली. बागलाण तालुक्यात यंदा सुमारे ७० हजार हेक्टरवर कांदा पिकाची लागवड करण्यासाठी रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी १० कोटी रुपयांचे कांद्याचे बियाणे टाकण्यात आले होते. परंतु अवकाळीमुळे जमिनीतून वर आलेले रोपे खराब झाली. तसेच उगवण्यापूर्वीच बियाण्यांमधून रोपे तयार होण्याची क्षमता नष्ट झाल्याने हे बियाणे वाया गेल्यात जमा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला आहे. अवकाळीमुळे अन्य शेत पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे शंभर टक्के पंचनामे करण्यात यावेत, अशी सूचना आमदार बोरसे यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी केकान यांनी संबंधित क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
यंदा चाळीत साठवलेल्या उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसऱ्या बाजूला कांद्याला योग्य भाव मिळाला नाही. अशा स्थितीत लेट खरीप व उन्हाळी कांदा लागवडीसाठीचे रोपे खराब झाल्याने एकट्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांचा किमान १० कोटींच्या बियाणांवरील खर्च वाया गेल्याची खंत बोरसे यांनी यावेळी बोलून दाखवली. याप्रसंगी भाजपचे बागलाण तालुका अध्यक्ष शरद भामरे,डांगसौदाण्याचे सरपंच मोठाभाऊ सोनवणे, कैलास बोरसे, कैलास केल्ले, रावसाहेब सोनवणे, संजय देशमुख ,संजय सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, निवृत्ती सोनवणे, महेश वाघ, प्रवीण पवार, गोकुळ पवार,अमोल खैरनार, दीपक वाघ, दीपक देवरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
