मालेगाव : गेली दोन दिवस अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होत आहेच पण अचानक कोसळणाऱ्या या पावसामुळे लोकांची देखील धांदल उडत आहे.

मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील नदीला आलेल्या पूर पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने एक तरुण असाच दुचाकीसह फरशी पुलावरून वाहून गेला. सुदैवाने नदीत असलेल्या एका झाडाचा त्याला आधार मिळाला पण संकट टळलेले नव्हते. अंधाऱ्या रात्रीत लोकांकडून मदत मिळेल का आणि या संकटातून आपण वाचणार का,अशा असुरक्षिततेच्या भीतीमुळे त्याची अक्षरश: गाळण उडाली होती. सुदैवाने बरीच प्रतीक्षा केल्यावर त्याला मदत मिळाली आणि तो सुखरूपपणे बचावला.

संदीप बंडू खैरनार (२२) असे या थरारक घटनेत बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो सौंदाणे गावातील गलाटी नदीच्या फरशी पुलावरून दुचाकीने घराकडे निघाला होता. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे या नदीला पूर आलेला होता. पुराचे पाणी जरी फरशीवरून वाहत होते तरी ते फार नसल्याने आपण सहज पूल पार करु, अशी खात्री संदीपला होती. त्यानुसार तो निघाला असताना या पुलावरच त्याची दुचाकी बंद पडली. त्यानंतर ही दुचाकी ढकलत तो पलीकडे निघण्याचा प्रयत्न करीत असतानाच अचानक पुराचा प्रवाह वाढला. त्यात काही कळण्याच्या आत तो दुचाकीसह पुरात वाहून गेला. तेथून काही अंतर वाहत गेल्यावर त्याला अचानक एका झाडाचा आधार मिळाला. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता तो झाडावर चढला.

रात्रीचा अंधार असल्याने तसेच तो वाहून गेल्याचे कोणाच्याही निदर्शनास न आल्यामुळे लोकांची स्वतःहून त्याला मदत मिळणे अवघड होते. झाडाचा आधार मिळाला असला तरी हे झाड पूर पाण्याने वेढले होते आणि अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतच होत्या. पूर पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याचा धोकाही असल्यामुळे संदीप हा प्रचंड भेदरला होता. अशा स्थितीत त्याने आजूबाजूच्या लोकांची मदत मिळावी म्हणून आरडाओरडा सुरू केल्यानंतर हा प्रकार लोकांच्या निदर्शनास आला. काही वेळानंतर या ठिकाणी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली. परंतु,पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने गावकऱ्यांची बचावकार्य राबविण्याची हिंमत होऊ शकली नाही. परिस्थितीचा अंदाज आल्याने गावचे सरपंच चेतन पवार यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधीक्षक संजय पवार यांना या संदर्भात तात्काळ भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.

ही माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. या दलाचे शकील तैराकी यांनी स्वतः पाण्यात उडी घेत संदीपची सुखरूप सुटका केली. संदीप हा झाडाच्या आधाराने जवळपास तीन तास पुराच्या पाण्यात अडकून पडला होता. पुराच्या पाण्यातून त्याची सुखरूप सुटका झाल्यावर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. रात्रीच्या अंधारात पुरात वाहून गेल्याचे कुणालाही कळाले नव्हते. अशा वेळी जर का झाडाचा आधार मिळाला नसता आणि अग्निशामक दलाची मदत वेळेवर मिळाली नसती तर काय झाले असते, या कल्पनेने अजूनही संदीपचा थरकाप उडत आहे.

मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील बचावकार्य पथकात शकील तैराकी, रफिक खान व विकास बोरगे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या बचावकार्यात दाखवलेले धाडस आणि तीन तास पुराच्या पाण्यात अडकलेल्या तरुणाची केलेली सुखरूप सुटका यामुळे गावकऱ्यांनी शकील तैराकी व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक केले आहे.