मालेगाव : काही दिवसांपासून शहर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असताना पोलिसांकरवी त्याचा छडा लावण्याचे प्रमाण मात्र नगण्य असल्याची तक्रार आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात समितीने येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांना निवेदन देत चोरीच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस दलाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >>> नाशिक: झोक्याचा गळफास लागून बालकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोऱ्यांमुळे मालेगावकर त्रस्त झाले असून योग्यप्रकारे कुलूप लावले असले तरी चोरट्यांकडून बेमालुमपणे दुचाकी लांबविण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. शहरातील पाण्याचे इलेक्ट्रिक पंप चोरण्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. भ्रमणध्वनीवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांचा भ्रमणध्वनी दुचाकीने येणाऱ्या चोरट्यांकडून काही कळण्याच्या आत पळविले जातात. रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचे प्रकारही असेच वारंवार घडत असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे. या चोरीच्या घटनांबद्दल काही नागरिक पोलिसात तक्रार करतात. तर काही जण मात्र कंटाळा करतात. पोलीस यंत्रणेला तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्या संदर्भात सीसीटीव्ही छायाचित्रण उपलब्ध झाल्यावरही अशा घटनांचा योग्य तो तपास होतांना दिसत नाही. याचे नक्की कारण काय, या प्रकारांना अंकुश का लागत नाही, याबद्दल समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस गस्त वाढविण्यात यावी, महत्वाच्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक करावी, चोरीच्या घटनांचा तपास जलद गतीने व्हावा, यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करावी, पोलीस दलाची कुमक वाढविण्यात यावी आदी मागण्या समितीतर्फे करण्यात आल्या आहेत. यावेळी समितीचे निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, भरत पाटील, कैलास शर्मा, विवेक वारूळे आदी उपस्थित होते.