मालेगाव : मालेगाव शहरात नील गाईंची कत्तल करून अवैध मांस विक्री करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा व वनविभागाच्या संयुक्त पथकाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकास अटक करण्यात आली आहे.
शहरातील बेलगाम भागातील एका घरात नील गाईचे मांस विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखेस प्राप्त झाली होती. त्यानुसार वन खाते व पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. घरातील एका खोलीत कत्तल केलेल्या नील गाईंचे दोन शीर, मांस, कातडी व अन्य अवयव निदर्शनास आले. तसेच कत्तल करण्यासाठी लागणारे धारदार हत्यारे, वजन काटा आदी वस्तू घटनास्थळी आढळून आल्या. त्यामुळे या ठिकाणी कत्तल केलेल्या नील गाईंचे मांस अवैध पद्धतीने विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले.
नील गाईंचे मांस विक्री करणाऱ्या महसूद अहमद अब्दुल मजीद (३०,रजा नगर) यास पथकाने रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून ३४ किलो मांस व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महसूद यास न्यायालयापुढे उभे केले असता त्याला चार दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुदसिर अहमद व परवेज अहमद हे मालेगावातील आणखी दोन संशयित फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. भारतात नील गायला वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत अनुसूची २ भाग अ मध्ये संरक्षित वन्यजीव म्हणून स्थान आहे. त्यामुळे संशयितांविरोधात भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक राकेश सेपट व सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे, परिमंडळ अधिकारी धनराज बागूल, वनरक्षक रावसाहेब सोनवणे, अनिल ठाकरे, योगेश पाटील, महेंद्र भदाणे, नागेश बागुल, व्यंकट केंद्रे,गोपाळ गवळी, भगवान धाडीवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
वन्य प्राण्यांची हत्या करून अवैध मांस विक्री करण्याचे प्रकार मालेगाव शहरात अधून मधून समोर येत असतात. त्या विरोधात वन खाते व पोलीस दलाने यापूर्वी अनेकदा कारवाया केल्या आहेत. मात्र तरीदेखील वन्य प्राण्यांची हत्या व त्यांचे मांस विक्री करण्याचे प्रकार छुप्या पद्धतीने होतच असल्याचे नील गाईंची कत्तल केल्यासंबंधी उघडकीस आलेल्या ताज्या प्रकरणाने सिध्द होत आहे. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाट परिसरात नीलगाईंचा वावर आढळून येतो. त्यामुळे त्या भागातून या नीलगाई पकडून आणल्या असाव्यात व नंतर मालेगावात आणून त्यांची कत्तल केली असण्याची शक्यता वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी व्यक्त केली आहे.