जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानंतर सोमवारी सकाळी हिवरा नदीला मोठा पूर आला. दरम्यान, नदी दुथडी भरून वाहत असताना दुपारी एका अनोळखी प्रौढ व्यक्तीने पुलावरून सर्वांच्या समोर अचानक उडी घेतली. त्यानंतर बेपत्ता झालेली ती व्यक्ती जारगाव येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पोलिसांनी तपास केल्यावर त्यास दुजोरा मिळाला नाही.

पाचोरा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने आधीच परिस्थिती बिकट झाली आहे. तशात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसाने पुन्हा हाहाकार माजला आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात बनोटी परिसरात तसेच पाचोरा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पुन्हा दमदार पाऊस झाल्यावर अग्नावती, हिवरा, बहुळा, इंद्रायणी, गडद, तितुर आणि उतावळी, या नद्यांना मोठे पूर आले. पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. नगरदेवळा गावातील बाजारपेठेतही पाणी शिरले. पाचोरा शहरातील कृष्णापुरी आणि पांचाळेश्वर जवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पाचोरा शहर ते कृष्णापुरी दरम्यानचा रस्ताही बंद झाला. हिवरा नदीच्या काठावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. 

दरम्यान, हिवरा नदीला आलेल्या पुराचे पाणी पाहण्यासाठी अनेक नागरिक पुलावर जमा झाले होते. त्याच वेळी नेमका एक प्रौढ व्यक्ती पुलाच्या कठड्यावर चढला. तो नदीत उडी मारण्याच्या बेतात दिसत असताना, त्यास तिथे उपस्थित असलेल्यांनी तसे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. काहींनी पोलिसांना त्याची माहिती दिली. परंतु, आजुबाजुच्या लोकांनी रोखल्यानंतरही त्याने हिवरा नदीच्या पुरात उडी घेतली. त्यामुळे उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. काही क्षणानंतर पोलीस घटनास्थळी झाले. परंतु, तोपर्यंत ती व्यक्ती पुराच्या पाण्यात बेपत्ता झाली होती. हिवरा नदीत उडी घेणारी व्यक्ती नेमकी कोण होती, याची माहिती घेत असताना ती जारगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. मात्र, तशी कोणतीच व्यक्ती जारगावातून बेपत्ता झाली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.