नाशिक : राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर चित्रफितीद्वारे केलेल्या टिकेला राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले. सभागृहाचे नियम आपणांस माहिती आहेत. आपण भ्रमणध्वनीवर ’रमी‘ हा गेम खेळत नव्हतो. डाऊनलोड झालेला गेम बंद करत होतो. भ्रमणध्वनीवरील आपली अर्धवट चित्रफित रोहित पवार यांनी प्रसारित केली. पुढील बंद केलेली चित्रफित दाखविली नाही, असे सांगत कृषिमंत्री कोकाटे यांनी रोहित पवारांसह विरोधी पक्षांच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडले.

आ. रोहित पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नसल्याने शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असल्याचा दावा केला आहे. राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करीत असतानाही काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांंवर रमी खेळण्याची वेळ येत असावी, असे टोमणा मारत कोकाटे यांची सभागृहातील चित्रफित प्रसारित केली आहे. यावर अधिवेशनावरून नाशिकमध्ये परतलेल्या कृषिमंत्री कोकाटे यांनी प्रत्युत्तर देताना रोहित पवारांचे हे रिकामे उद्योग असून ते स्वत:ची करमणूक करीत असल्याचा टोला त्यांनी हाणला.

मुळात सभागृहात विधान परिषदेतील कामकाज यु ट्युबवर पाहण्यासाठी आपण भ्रमणध्वनी सुरू केला होता. डाऊनलोड झालेला गेम काढून टाकत होतो. त्यांनी पुढील काही दाखवले नाही. आतापर्यंत रोहित पवारांचे माझ्या संदर्भातील काय प्रश्न आहेत, शेतकऱ्यांसंदर्भात त्यांनी एक तरी प्रश्न विचारला का, असे प्रश्न कोकाटे यांनी उपस्थित केले. आम्ही शेतकऱ्यांसाठी गावोगाव फिरतो. विभागात जातो. बैठका घेतो. धोरण तयार करतो. आदेश देतो, इतक्या मोठ्या प्रमाणात काम सरू असून ते त्यांना दिसत नाही, असेही कोकाटे यांनी सुनावले.

कोणत्या गोष्टीचे भांडवल करावे, हे आमदार रोहित पवारांना कळत नाही. यु ट्यूब सुरू केल्यावर कोणाच्याही भ्रमणध्वनीवर जाहिराती येतात. रोहित पवारांच्या भ्रमणध्वनीवर येत नाही का, असा प्रश्न त्यांनी केला. अधिवेशनात विरोधकांना काहीही करता आले नाही. कारण नसताना लक्ष्य केले जात आहे. विरोधकांना आपले सरकार कधीही येऊ शकणार नाही याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी मंत्र्यांविरोधात गरळ ओकणे आणि बदनामी करण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतला आहे. कधी आपल्या कपड्यांवर, कधी भमणध्वनीवर तर कधी गाडीवर बोलले जाते. माझ्या कामांवर, धोरणांवर. शेतकऱ्यांसाठीच्या उपायांवर विरोधी पक्ष बोलत नसल्याची टीका कोकाटे यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषी विभागाकडे भरपूर निधी असून योजनाही चांगल्या आहेत. अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांविषयी आपण कुठलेही विधान केलेले नाही. त्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतल्याचा दावा कृषिमंत्री कोकाटे यांनी केला.