नाशिक – विधीमंडळ सभागृहात भ्रमणध्वनीवर कथित रमी खेळण्याच्या प्रकरणात कृषिमंत्री पदावरून उचलबांगडी होऊन माणिकराव कोकाटेंना राज्याच्या क्रीडा खात्याची जबाबदारी सोपविली गेली. याचा अर्थ त्यांना सोयीचे खाते मिळाले, शासनाने माणिकराव कोकाटेंना रमी खेळायला जणू मुक्त परवानगी दिल्याची प्रतिक्रिया शेतकरी समन्वय समिती आणि राज्यातील ९३८ आदिवासी विकास सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून उमटली आहे.
शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त विधानांनी नेहमी अडचणीत सापडणारे माणिकराव कोकाटे विधिमंडळ सभागृहात कथित ऑनलाईन रमी खेळताना आढळले. आणि यासह आपल्या जुन्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण देताना पुन्हा नव्या चक्रव्युहात अडकले. कोकाटे यांच्या बोलघेवडेपणाने सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांना कायमचा नारळ दिला जाईल किंवा खातेबदल होईल, अशी चर्चा रंगली होती. अखेरीस मंत्रिपद शाबूत राहिले, मात्र कृषिखाते गमावले. क्रीडा खात्याची जबाबदारी कोकाटेंंना दिली गेली. यावर शेतकरी संघटनांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
९३८ आदिवासी विकास सहकारी संस्थेचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे यांनी शासनाने माणिकराव कोकाटेंना क्रीडामंत्री करून रमी खेळायला एकप्रकारे मुक्त परवाना दिल्याची खरमरीत प्रतिक्रिया व्यक्त केली. आता ते कुणाकुणाला हा खेळ खेळण्यास प्रोत्साहित करतील, याच नेम नसल्याचा टोला त्यांनी लगावला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेत कोकाटेंनी शेतकऱ्यांचा विरोध डावलून नव्या सामोपचार कर्ज परतफेड योजनेला एकतर्फी मान्यता दिल्याची तक्रार त्यांनी केली. कोकाटे यांच्या कार्यपद्धतीने शेतकरी अधिक अडचणीत सापडल्याची तक्रार शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी केली. शासनाने त्यांना क्रीडामंत्री करीत एकप्रकारे आवडीचे खाते दिल्याची उपरोधिक प्रतिक्रिया बोराडे यांनी व्यक्त केली.
खाते बदलाने शेतकऱ्यांचे नुकसान
बोलण्याच्या ओघात माणिकराव कोकाटे हे बोलून जायचे. त्यांच्या मनांत काहीही नसायचे. मंत्रिमंडळात कितीतरी भ्रष्टमंत्री आहेत. कोकाटेंचे कृषिखाते केवळ बोलले म्हणून काढून घेतले गेले, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी म्हटले आहे. कृषी खात्यात त्यांनी चांगले काम सुरू केले होेते. जीएम तंत्रज्ञान, एसटीबीटी बियाणे यासाठी केंद्रात त्यांनी पाठपुरावा केला होता. कोकाटेंना कृषिखाते गमवावे लागणे ही बाब कांदा उत्पादकांच्या दृष्टीने नुकसानकारक ठरल्याचे कांदा उत्पादक संघर्ष समितीचे दीपक पगार यांनी नमूद केले. कारण, कांद्याबाबत त्यांना चांगली माहिती होती. कृषिमूल्य आयोगात कोकाटेंनी कांदा व टोमॅटोचा समावेश करून समिती स्थापन केली. बटाट्याप्रमाणे कांदा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील होते. कृषी खात्याची नव्याने जबाबदारी मिळालेले दत्ता भरणे यांना प्राथमिक अभ्यासापासून सुरुवात करावी लागेल. त्यांचे कांद्याबाबत ज्ञान किती, याबद्दल पगार यांंनी साशंकता व्यक्त केली.