जळगाव : सभागृहात ऑनलाइन रमी खेळल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले तत्कालिन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना गेल्या महिन्यात धुळे जिल्ह्यात काळे झेंडे दाखविण्यात आले होते. त्यामुळे धास्तावलेल्या मंत्री कोकाटे यांनी त्या दिवसाचा जळगाव जिल्हा दौरा अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रविवारी अजित पवार गटाच्या मेळाव्यास कोकाटे यांनी हजेरी लावली. या वेळी रात गयी बात गयी… म्हणत त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.
वादग्रस्त विधानांमुळे आधीच चर्चेत असलेले मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहाचे कामकाज चालू असताना भ्रमणध्वनीवर ऑनलाईन तीन पत्ती रमी खेळत असल्याची चित्रफीत सगळीकडे चांगलीच गाजली. विरोधकांनी त्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही कोंडी झाली होती. दरम्यान, मंत्री कोकाटे हे शिंदखेडा तालुक्यात एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी गेले होते. धुळे जिल्ह्यात आधीच समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना, कांदा तसेच कापूस उत्पादकांची विचारपूस करण्यासाठी शेतांच्या बांधावर न जाता खासगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी कृषिमंत्र्यांना कसा वेळ मिळतो, असा जाब त्यांना शरद पवार गटासह ठाकरे गटाने त्यांना विचारला होता.
शिंदखेडा तालुक्यातील पेट्रोल पंपाचे उद्घाटन पार पडल्यानंतर कोकाटे दुपारी जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहराकडे प्रस्थान करणार होते. त्यानुसार, त्यांच्या दौऱ्याचे नियोजन जळगाव जिल्हा प्रशासनाला प्राप्तही झाले होते. परंतु, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातच महाविकास आघाडीच्या विरोधाला तोंड द्यावे लागल्याने कोकाटे यांनी चोपडा तालुक्याचा दौरा रद्द करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. मंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इकडे जय्यत तयारी करून ठेवली होती. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाही वाटून झाल्या होत्या. प्रत्यक्षात, मंत्रीच कार्यक्रमाला येणार नाही म्हटल्यावर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला होता.
मधल्या काळात बऱ्याच वेगवान घडामोडी घडल्या. विरोधकांकडून थेट राजीनाम्याची मागणी केली जात असताना महायुतीने माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले. आणि त्यांच्याकडे तुलनेने कमी महत्व असलेले क्रीडा खाते सोपवले. त्यानंतर कोकाटे हे रविवारी जळगाव दौऱ्यावर आले. गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेता त्यांचा या वेळचा दौरा सर्वत्र चर्चेचा विषय देखील ठरला. त्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता माणिकराव कोकाटे यांनी मिश्किल उत्तर देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. रात गयी बात गयी… प्रत्येक गोष्ट उकरून काढण्यात माणसाचे आयुष्य निघून जाईल. पुढे काही विषय असतील त्याच्यावर चर्चा करा. पुढे लोकांना कसा न्याय देता येईल, त्यासंदर्भात बोलू. मागे काय झाले त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पुढची माझी इनिंग जोरदार असेल, असेही त्यांनी बोलून दाखवले.