मनमाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भूमिपूजन आणि उद्घाटन केलेल्या येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वसतिगृहास प्रेरणाभूमी म्हणून घोषित करून राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा तसेच दरवर्षी १७ नोव्हेंबर हा दिवस प्रेरणादिन म्हणून शासकीय पातळीवर साजरा व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी १५ सप्टेंबर रोजी जनआंदोलन करण्याचा निर्धार आंबेडकरी अनुयायांनी केला आहे.
प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक सिद्धार्थ हौसिंग सोसायटीतील सुगंधकुटी बुद्ध विहारात पार पडली. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद पगारे अध्यक्षस्थानी, तर बाबुराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल खरे यांनी केले. मनमाड येथील हे वसतिगृह सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा ऐतिहासिक केंद्रबिंदू ठरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः या वास्तूचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले आहे. त्यामुळे या वास्तूला केवळ स्थानिक नव्हे, तर राष्ट्रीय महत्त्व आहे. म्हणूनच या वास्तूचा ’प्रेरणाभूमी’ म्हणून उल्लेख व्हावा. शासनाने यास अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी खरे यांनी केली.
या बैठकीत प्रेरणाभूमीच्या विकासासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. ॲड. मनीष रणशूर यांनी या समित्यांची घोषणा केली. किरण गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. हे आंदोलन केवळ मागणीसाठी नसून, इतिहासाचा सन्मान करण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
१५ सप्टेंबर रोजी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन, मुख्यमंत्री, केंद्रीय व राज्य समाजकल्याण मंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि पुरातत्व विभागाकडे सविस्तर प्रस्ताव सादर करणे, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेणे, आदी निर्णय यावेळी घेण्यात आले. बैठकीला मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जालिंदर इंगळे, शैलेंद्र गायकवाड, संजय बनसोडे यांनी केले. आभार अशोक पाईक यांनी मानले. सर्वांनी एकमुखाने या आंदोलनात सहभागाची तयारी दर्शवली आणि प्रेरणाभूमीच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मनमाड शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भूमिपूजन आणि उद्घाटन केलेली वास्तू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वसतिगृह होय. या वसतिगृहास प्रेरणाभूमी म्हणून तसेच राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी, नेते आणि कार्यकर्ते एकवटले आहेत.