नाशिक : मनमाड शहरातील धाडसी घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड पोलिसांना यश आले. या प्रकरणात तीन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून एक कोटीहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या प्रकरणात अटक झालेले संशयित हे सराईत गुन्हेगार आहेत.

ग्रामीण पोलिसांनी कारागृहातून सुटलेले आणि पोलीस नोंदीतील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मनमाडच्या डमरे कॉलनीत ही घटना घडली होती. येथील व्यावसायिक मुर्तजा रस्सीवाला हे कुटूंबियांसह बाहेरगावी गेले असताना चोरटयांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून कपाटात ठेवलेले १२०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि आठ लाखांची रोकड असा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घरफोडीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मालेगावचे अपर अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड पोलिसांना हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना केल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्यासह मनमाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर, मनमाडचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी संशयितांची गुन्हा करण्याची पध्दत आणि घटनास्थळावरील तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पडताळणी केली असता हा गुन्हा स्थानिक सराईत गुन्हेगारांनीच केल्याचा निष्कर्ष काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनमाड शहर आणि चांदवड परिसरातून संजय गायकवाड (३५), राकेश संसारे (३०, दोघेही रा. आनंदवाडी, मनमाड), राजेश शर्मा उर्फ भय्या (३०, मदिना चौक, सारडा सर्कल, नाशिक, मूळ गोरखपूर, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांकडून १०५५ ग्रॅम (एक किलो ५५८५० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत एक कोटी पाच लाख ४० हजार रुपये अशी आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्ह्यात संशयितांनी वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुन्हे शाखेमार्फत कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येकवेळी वेगवेगळ्या साथीदारांसह गुन्हे

या प्रकरणातील राजेश शर्मा उर्फ भय्या (मूळ गोरखपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध घरफोडी, दरोडा तयारी, चोरी, जबरी चोरीचे एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. तर मनमाड येथील संजय गायकवाड आणि राकेश संसारे यांच्यावर अनुक्रमे आठ आणि चार गुन्हे दाखल आहेत. संशयित शर्मा हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गुन्हेगारांना बरोबर घेऊन गुन्हे करतो. राहण्याचे ठिकाण नेहमी बदलतो. अलीकडेच तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जामिनावर मुक्त झाला होता. तेव्हापासून त्याने मनमाड येथील साथीदारांसह पुन्हा गुन्हा केला.