नाशिक – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण केंद्र म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणाऱ्या मनमाडच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखण्याची कामगिरी बिहारमधील राजगीर येथे नुकत्याच संपलेल्या सातव्या खेलो इंडिया राष्ट्रीय युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत केली. या स्पर्धेत दोन सुवर्णांसह एक रौप्य मिळविणाऱ्या मनमाडने तीन पदकांची कमाई केली. मनमाडच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये आतापर्यंत झालेल्या सात खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत १८ पदकांची कमाई केली आहे. त्यात खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील तीन पदकांचा समावेश केल्यास ही संख्या २१ पर्यंत जाते.
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक यासारख्या मोठ्या शहरांनी एखाद्या खेळात सलगपणे पदकांची कमाई करणे यात विशेष असे काही नाही. परंतु, मनमाडसारख्या ग्रामीण भागातील शहराने आणि तेही वेटलिफ्टिंगसारख्या खेळात राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणे, त्यात सातत्य राखणे हे नक्कीच गौरवास्पद म्हणावे लागेल. अर्थात, त्यासाठी प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांनी केलेले परिश्रम आणि त्यास मनमाडकरांनी केलेले सहकार्य प्रेरणादायक आहे. त्यामुळेच राष्ट्रकुल, एशियाड, ऑलिम्पिक यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवात पदकांच्या यादीत भारताकडून मनमाडचे नाव झळकण्याचा दिवस फार दूर नाही. साईराज परदेशी, मुकूंद आहेर, आकांक्षा व्यवहारे, पूजा परदेशी हा भारताचा भविष्यकाळ आहे. साईराजने सातव्या खेलो इंडिया स्पर्धेत केलेली कामगिरी ऐतिहासीक अशीच आहे. स्नॅचमध्ये १४० किलो, क्लीन जर्कमध्ये १७२ असे एकूण ३१२ किलो वजन वजन उचलत तीन नवीन राष्ट्रीय विक्रम त्याने स्थापित केले. मागच्या वर्षी केलेले स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम त्याने एक किलो अधिक वजन उचलून मोडीत काढला. आपल्या सलग तिसऱ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत साईराजने पदक प्राप्त केले. २०२३ इंदूर येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक, २०२४ चेन्नई येथील स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. यावर्षी बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेला साईराज आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पतियाळातील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात सराव करीत आहे. या केंद्रात त्याला डी. डी. शर्मा, अलोकेश बरुवा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
राजगीरच्या स्पर्धेतच आकांक्षा व्यवहारेने सुवर्ण तर, आनंदी सांगळेने आपल्या पहिल्याच खेलो इंडिया युवा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मनमाडची कामगिरी दैदिप्यमान राहिली आहे. दिल्लीतील पहिल्या स्पर्धेत खुशाली गांगुर्डेने रौप्य, धनश्री पवार आणि पूजा परदेशीने कांस्य, पुण्यातील दुसऱ्या स्पर्धेत निकिता काळेने रौप्य, गोहाटीतील तिसऱ्या स्पर्धेत प्राजक्ता खालकर आणि मुकुंद आहेरने सुवर्ण, निकिता काळेने रौप्य, करुणा गाढेने कांस्य, पंचकुलातील चवथ्या स्पर्धेत मुकुंद आहेरने सुवर्ण, इंदूरमधील पाचव्या स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे आणि वीणाताई आहेर यांनी सुवर्ण, साईराज परदेशीने कांस्य, चेन्नईतील सहाव्या स्पर्धेत साईराज परदेशी आणि मेघा आहेरने सुवर्ण, कृष्णा व्यवहारेने कांस्यपदक मिळविले आहे. इतकेच नव्हे तर, भुवनेश्वर येथील खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत निकिता काळेने रौप्यपदक, प्राजक्ता खालकरने सुवर्ण, धर्मशालातील स्पर्धेत पूजा परदेशीने सुवर्णपदक मिळविले आहे. छत्रे विद्यालयाचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग आणि जय भवानी व्यायामशाळेच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळणारे सहकार्य निश्चितच खेळाडूंच्या या यशाला कारणीभूत आहे.