नाशिक – दीड दिवसाचा गणपती साजरा करून जिल्ह्यातील मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी करीत आहे. नाशिकमधून दुचाकी, रिक्षा, मोटार, टेम्पो व बसेस अशा विविध प्रकारच्या वाहनांमधून शुक्रवारी मराठा बांधव मुंबईकडे मार्गस्थ होतील. या आंदोलनाची जनजागृती व मुंबईत आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी सकल मराठा समाजाने मनोज जरांगे यांचे छायाचित्र आणि ‘चलो मुंबई… मी येणार, तुम्ही पण या’ असे आवाहन करणारी तब्बल १० हजार स्टिकर्स तयार केली आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे. आंतरवली सराटीमधून ते मार्गस्थ झाले. मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यााचा सरकारचा निर्णय रास्त ठरवल्यानंतर सरकारने त्यांना एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नाशिक जिल्ह्यात सकल मराठा समाजाने बैठकीतून आधीच नियोजन केले. अनेकदा निवेदने दिली गेली. परंतु, सरकार निर्णय घेत नसल्याने मनोज जरांगे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. हे आंदोलन तीव्र केले जाईल. मराठा समाजाची ताकद सरकारला परवडणारी नाही. मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानात तळ ठोकण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
गणेशोत्सव दीड दिवसांचा साजरा करून, जिल्ह्यातील हजारो मराठा समाजबांधव स्वत:ची वाहने अथवा रेल्वेने मुंबईत दाखल होतील. मुंबईतील आंदोलनात कशाचीही कमतरता भासणार नाही. आंदोलनात अन्न धान्याचा पुरवठा करण्याची नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आधीच दाखवली आहे. आर्थिक रसद व भोजनाची जबाबदारी स्वीकारण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला होता. शहर व ग्रामीण भागातील मराठा बांधव पूर्ण ताकतीने मुंबईत आंदोलनात सहभागी होतील. यासाठी वाहनांसह बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने, टेम्पो आदींमधून हे सर्व जण मुंबईकडे मार्गस्थ होणार असल्याचे करण गायकर यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाजाने वाहनांवरील लावण्यासाठी १० हजार स्टिकर्स छापली आहेत. एकच मिशन मराठा आरक्षण असा उल्लेख असणारी ही स्टिकर्स नाशिकचे ग्रामदैवत कालिका मंदिर प्रांगणातून वितरित केली जात आहे. मराठा बांधवांची जी वाहने मुंबईतील आंदोलनात सहभागी होतील, त्यांना या स्टिकर्सचे वितरण केले जात असल्याचे गायकर यांनी सांगितले. राज्य सरकारने मराठा समाजाचा अंंत पाहू नये. मराठे मुंबईत शिरले तर, मागे हटणार नाहीत. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, आदींकडे गायकर यांच्यासह सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.