नाशिक: जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविषयी तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, बिबट्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी जीपीएस यंत्रणेची अंमलबजावणी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वन विभागाच्या कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
केशव पोरजेंसह शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) उपनेते दत्ता गायकवाड, वसंत गिते, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे काही पदाधिकारीही मोर्चात सहभागी झाले होते. शहराचा वेगाने विस्तार होत असतांना वनक्षेत्र कमी होत आहे. शहराजवळील शेतीही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जंगलात राहणारे वन्यप्राणी आता शहरात येऊ लागले आहेत. मानव आणि वन्यप्राणी संघर्ष होऊ लागला आहे. नाशिकरोड परिसरातील वडनेर गेट येथे साडेतीन वर्षाच्या बालकाला अलीकडेच बिबट्याने ओढून नेले. वडनेर गेट भागात सायंकाळी बालक घरासमोरील ओट्यावर खेळत असताना बिबट्याने त्याला उचलून नेले. चार ते पाच तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. मोर्चात या बालकाच्या पालकांसह घरातील इतर सदस्यही सहभागी झाले होते.
विहितगाव, दारणासांगवी, चेहडी, चाडेगाव, सामनगाव, हिंगणवेढा, एकलहरे , लहवित रोड याठिकाणीही यापूर्वी बिबट्याचे हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये पशुधनाची हानी झाली आहे. वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात येत असल्याचा दावा केला जातो. बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, बिबट्याचे हल्ले थांबवावेत,यासाठी मोर्चा काढण्यात आला.
एका वर्षात किती बिबटे पकडले, पकडलेले बिबटे कोणत्या जंगलात सोडण्यात आले, बिबट्या दिसल्याची नागरिकांनी तक्रार केल्यावर काय कारवाई करण्यात आली, वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात किती जनावरे, नागरिकांचा मृत्यू झाला,असे प्रश्न मोर्चेकऱ्यांकडून अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. बिबट्याला पकडा, अन्यथा त्याला पकडून तुमच्या कार्यालयात सोडू, योग्य कारवाई न झाल्यास वनमंत्र्यांकडे मोर्चा नेऊ, असा इशारा देण्यात आला.
नागरिकांच्या भावना लक्षात घेता १५ दिवसात बिबट्या पकडला जाईल, असे आश्वासन वन अधिकाऱ्यांनी दिले. बिबट्या पकडतांना वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पध्दती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कामात येणाऱ्या अडचणींची माहिती मोर्चेकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
मोर्चात वन्यप्राण्यांंचे मुखवटे
बिबट्याचा जिल्हा परिसरातील वावर गंभीर असून याकडे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांचे मुखवटे घालून काही जण सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.