नाशिक : दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरांमध्ये बम बम भोलेचा जयघोष झाला. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने त्र्यंबकच्या अर्थकारणाला चालना मिळाली आहे. पूजेचे सामान, प्रसाद, उपवासाचे खाद्यपदार्थ यांची दुकाने तसेच अभिषेक सामान असणाऱ्या दुकानांमध्ये खरेदीने लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

श्रावणात शिवभक्तीला विशेष महत्व असल्याचे मानले जाते. शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक, रुद्रपूजन केले जात असल्याने शिवमंदिर परिसरात दूध, दहीचे वाटे तसेच अभिषेकासाठी लागणारे साहित्य, फुले यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील प्रत्येक सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करण्यात येते.

दुसऱ्या सोमवारीही मोठ्या संख्येने भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. तिसऱ्या सोमवारी प्रदक्षिणेसाठी अधिक गर्दी होत असते. परंतु, यंदा दुसऱ्या सोमवारीही मोठी गर्दी झाल्याने प्रशासनही चकित झाले. रविवारी रात्रीपासूनच प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची ये- जा सुरू होती. सोमवारी पहाटे प्रदक्षिणा पूर्ण करुन भाविकांनी घरी जाण्यास सुरूवात केली. त्यातच ब्रह्मगिरी चढण्यासाठीही अनेकांनी गर्दी केली.

चढ-उतार करण्याचा मार्ग एकच असल्याने कोंडी होत होती. या परिस्थितीकडे वन विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. कुशावर्त येथे स्नानासाठी भाविकांनी गर्दी केल्याने प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रणासाठी उपाय करण्यात आले. बाहेरगावहून आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या.

दरम्यान, सायंकाळी विधीवत त्र्यंबकेश्वराच्या पालखीचे पूजन करुन मिरवणूक काढण्यात आली. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर अनेकांनी शिवशंकर, बम बम भोले आदी अक्षरे लिहिलेली वस्त्रे खरेदी केली. रुद्राक्ष माळांनाही मागणी होती. आदिवासी बांधवाच्या रानभाज्यांची दुकाने या परिसरात लागल्याने भाविकांसह पर्यटकांनी भाजी खरेदी केली. भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे त्र्यंबकमधील निवास व्यवस्थेचे दर वाढले.

दुसरीकडे, नाशिक येथे गोदाकाठावरील कपालेश्वर, सोमेश्वर, निळकंठेश्वर यांसह अन्य शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवमंदिरात रुद्राभिषेकासह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमेश्वर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरुप आले होते. कपालेश्वर येथे होणारी गर्दी पाहता मंदिर परिसराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी पेठ, सुरगाणा, नाशिक, इगतपुरी येथुन ३० हून अधिक जादा बसेस सोडण्यात आल्या. या प्रत्येक बसने दिवसाकाठी सहा फेऱ्या मारल्या. इगतपुरी येथील सर्वतीर्थ टाकेद येथेही शिवमंदिरात सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली.