मुत्थूट दरोडा: संशयितांच्या मराठी बोलण्याचे पोलिसांना कोडे

नाशिक : मुत्थूट वित्तीय संस्थेत गोळीबार करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न करताना एका कर्मचाऱ्याचा खून करणाऱ्या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीच्या मूख्य सूत्रधारासह पोलिसांनी कर्मचाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या परिमदरसिंग ऊर्फ गौरव याला गुजरातमधील कलोद्री येथे मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. हे सर्व संशयित परप्रांतीय असतांना त्यांनी मुत्थूटमधील कर्मचारी आणि ग्राहकांना मराठीतून धमकी कशी दिली? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

मुत्थूट फायनान्सच्या कार्यालयात १४ जून रोजी टोळक्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. गोळीबारात अभियंता संजू सॅम्युअल यांचा मृत्यू, तर व्यवस्थापक आणि कर्मचारी असे दोघे जखमी झाले होते. परमिंदरने गुन्ह्य़ाची कबुली दिली असून टोळीतील सर्व साथीदारांची नावे पोलिसांना मिळाली आहेत. उत्तर प्रदेशातील जितेंद्र आणि परमिंदरनंतर पोलिसांना आता आकाशसिंह राजपूत, पश्चिम बंगाल येथील पप्पू उर्फ अनुज साहु आणि मूळचा उत्तर प्रदेशचा सुभाष गौड, मनीष रॉय, राहुल उर्फ गुड्डू, माझी, उमेश तिवारी, सुबोधसिंग अशा ११ जणांचा तपास करावयाचा आहे.

परमिंदर कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी १३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बिहारमधील गुंड सुबोधसिंग याच्यासाठी परमिंदर काम करतो. दरोडय़ाच्या नियोजनात सुबोधसिंगचा सहभाग असून तो सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. पोलीस अन्य संशयितांच्या मागावर असून त्यांना पकडण्यासाठी १० पथके विविध राज्यात रवाना करण्यात आली आहेत.

परमिंदरच्या अटकेमुळे आंतरराज्य टोळीचा गुन्ह्य़ातील सहभाग निश्चित झाला असून या गुन्ह्य़ात प्रत्येकाचा काय सहभाग होता याची उकल होऊ लागली आहे. या प्रकरणी सध्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुंड सुबोधसिंगचे नाव समोर आल्याने त्या संदर्भात आवश्यक पत्रव्यवहार, माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे नांगरे पाटील म्हणाले. घटना घडली त्या वेळी प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार सर्व संशयित मराठीत बोलत होते. अटक तसेच फरार आरोपी बिहार, गुजरात, पश्चिम बंगालमधील असतांना ते मराठी भाषेचा कसा वापर करतील, असा प्रश्न पोलिसांना पडला असून त्या दृष्टीने तपास होत असल्याचेही नांगरे पाटील यांनी सांगितले.

असा उलगडला घटनाक्रम

सुबोधसिंग भारतातील बँका, वित्त कंपन्या आणि इतर मोठय़ा कार्यालयांमध्ये दरोडे टाकतो. परमिंदर हा त्याचा हस्तक आहे. परमिंदरने काही काळ उत्तर प्रदेशातील माजी मंत्र्यांच्या घरी कर्मचारी म्हणून काम केले होते. गुन्हेगार मनीष रॉयशी त्याची भेट झाली. आकाशसिंह सिंगची मे महिन्यात भेट घेण्यात आली. गुजरात येथे या सर्व गोष्टींचे नियोजन झाले. सुभाष गौड आधीच नाशिकमध्ये वास्तव्यास होता. त्याने मुत्थूट फायनान्सची पाहणी केल्यानंतर पाच जून रोजी परमिंदर हा गौरव बनून कार्यालयात माहिती घेण्यासाठी आला होता. कर्मचारी किती, सुरक्षा व्यवस्था कशी, याची सर्व पडताळणी केली. दरोडा टाकताना कोणी काय काम करायचे याची जबाबदारी निश्चित करण्यात आली. दरोडा टाकल्यानंतर पसार होताना कुठल्या रस्त्याने जायचे याचा गुगल मॅपच्या आधारे नकाशा तयार करण्यात आला. पेठ रोड येथे आयशर टेम्पोतून फरार व्हायचे आणि पुढे गेल्यावर वेगवेगळ्या मार्गाने इतरत्र जायचे ठरले. घटना घडली त्या दिवशी सॅम्युअलचा प्रतिकार अनपेक्षित होता. या अनपेक्षित घटनेमुळे  दरोडेखोरांची योजना फिस्कटली. लूट न करताच त्यांना काढता पाय घ्यावा लागला. आशेवाडी येथे येताच आयशर टेम्पो त्यांच्यासाठी उभाच होता. परंतु, दिंडोरीला नाकाबंदी असल्याने त्यांनी अन्य मार्गाने नाशिक सोडले.