नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी सहा ते सात हजार कोटींच्या कामांच्या निविदा आतापर्यंत अंतिम झाल्या आहेत. कुंभमेळ्याची कामे युद्धपातळीवर पुढे नेण्यावर लक्ष केंद्रीत केले जात असताना कुंभमेळा नियोजनासाठी राज्य सरकारने सात मंत्र्यांची जी मंत्री समिती स्थापन केली, त्या समितीच्या बैठकीला मात्र अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत चांगलेच बिनसले आहे. आगामी कुंभमेळ्यामुळे या पदास महत्व प्राप्त झाले. महायुतीतील अंतर्गत मतभेदात तो पेच सुटत नसल्याने अखेर कुंभमेळा कामात मित्रपक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांना मंत्री समितीत स्थान देण्यात आले. कुंभमेळ्याचे नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये कुंभमेळा मंत्री समितीची स्थापना केली.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील समितीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) छगन भुजबळ आणि ॲड. माणिक कोकाटे, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) दादा भुसे आणि उदय सामंत, भाजपचे जयकुमार रावल आणि शिवेद्रसिंह भोसले हे मंत्री सदस्य आहेत. समितीत तीन स्थानिक तर, चार जिल्ह्याबाहेरील मंत्री आहेत. महत्वाची बाब म्हणजे, नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेतील चारही मंत्री समितीत असल्याने समितीच्या कारभाराविषयी राजकीय व प्रशासकीय पातळीवर उत्सुकता आहे.
कुंभमेळा मंत्री समितीच्या स्थापनेला महिनाभराचा कालावधी उलटून गेला. मात्र आजतागायत समितीची स्वतंत्रपणे एकदाही बैठक झालेली नाही. कुंभमेळ्याशी संबंधित कामांसाठी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये वरचेवर येणे होते. कुंभमेळा प्राधिकरणाने आयोजिलेल्या कार्यक्रमात ते उपस्थित असतात. मात्र, समितीची बैठक झालेली नाही. कुंभमेळ्याशी संबंधित कार्यक्रमांचे समितीतील इतर मंत्र्यांना निमंत्रण मिळत नसल्याचे मध्यंतरी उघड झाले होते.
समितीचे सदस्य असणारे मंत्री कुंभमेळा नियोजन, कामांवर कधी एकत्रित विचार विनिमय करता येईल, या प्रतिक्षेत आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत कुंभमेळ्याची आढावा बैठक झाली होती. तेव्हा समितीतील मंत्री उपस्थित होते. या बैठकीत समिती सदस्य, मंत्री छगन भुजबळ यांनी गोदावरी नदीत सांडपाणी येणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना केली होती.
मुंबईतील शिखर समितीच्या बैठकीचा अपवाद वगळता मंत्री समितीतील सात सदस्य मंत्री स्थानिक पातळीवर एकदाही एकत्र आलेले नाहीत. कुंभमेळ्याशी संबंधित सहा ते सात हजार कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्णत्वास जाऊन त्यांचे वाटप झाले आहे. या प्रक्रियेत लहान कामे एकत्रित करून ती काही विशिष्ट बड्या ठेकेदारांना दिली गेल्याचा आक्षेप स्थानिक ठेकेदारांसह मित्रपक्ष शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) घेतला जात आहे.
काही कामे एकत्रित स्वरुपात का द्यावी लागली आणि काही एकत्रित स्वरुपात दिलेली नसल्याचे स्पष्टीकरण कुंभमेळामंत्री महाजन यांच्याकडून अनेकदा दिले गेले आहे. कुंभमेळा मंत्री समितीचे अध्यक्ष असणारे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे एकटेच संपूर्ण कारभार हाकत असल्याने समितीच्या सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे.