मालेगाव : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येथील ‘एमआयएम’चा कार्यकर्ता युसुफ इलियास (५४) यास आयेशानगर पोलिसांनी अटक केली. इलियास हा एमआयएम पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती यांचा कट्टर समर्थक आहे.
आमदार मौलाना यांच्या समर्थकांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याचा गेल्या अडीच महिन्यातील हा दुसरा प्रकार आहे. दरम्यान, एमआयएमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी गरीब कुटुंबातील आहे. तिच्या वडिलांना पक्षघाताचा विकार आहे. त्यामुळे गेल्या जानेवारी महिन्यात ती हुसेन शेठ कंपाउंडमधील इलियास याच्या कार्यालयात आर्थिक मदत मिळावी म्हणून गेली होती. तेव्हा त्याने तिला वरच्या मजल्यावर जाण्यास सांगितले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. भ्रमणध्वनीद्वारे त्याचे चित्रीकरण केले. नंतर तिला तीन हजार रुपये दिले व हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला, असे या संदर्भात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
बरे वाटत नाही म्हणून पीडित मुलगी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. तेव्हा ती रडत असल्याचे दृश्य एका महिलेने बघितले. अधिक विचारपूस केल्यावर तिने घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर या महिलेच्या मदतीने तिने पोलीस ठाणे गाठले व इलियास याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून इलियास यास अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. इलियास हा यंत्रमाग व्यवसायाशी संबंधित संघटनेचा प्रमुख पदाधिकारी आहे. तसेच एमआयएम पक्षातही तो सक्रिय असून आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल याचा तो अत्यंत निकटवर्तीय मानला जात आहे.
अडीच महिन्यांपूर्वी आपल्या कारखान्यात काम करणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मौलाना मुफ्ती यांचा निकटवर्तीय शफिक राणा याच्या विरोधात रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी राणा यास अटक करण्यात आली असून सध्या तो नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. धार्मिक नेता म्हणून मौलाना मुफ्ती इस्माईल यांचा मोठा नावलौकिक आहे. त्यांच्या दोन कट्टर समर्थकांना लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक होण्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्याने येथील राजकीय व यंत्रमाग उद्योग वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमच्या दोन कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हयांसंदर्भात पोलीस तपास सुरू असल्याने त्याविषयी आज अधिक भाष्य करणे योग्य नाही. यातील सत्यता समोर येणारच आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांना राजकीय कारणास्तव जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, हे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. – डाॅ.खालिद परवेज (उत्तर महाराष्ट्र प्रमुख, एमआयएम)