नाशिक – आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुण विकसित होण्यासाठी ६०० विद्यार्थी क्षमतेची क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी येथे दिली.

आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन झाले. यावेळी खा.डॉ. शोभा बच्छाव, आ. नितीन पवार, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त गोपीचंद कदम, दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी नरेश अकुनूरी (कळवण), अर्पिता ठुबे (नाशिक) उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. उईके यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी विद्यार्थी कल्पक आणि गुणवान आहेत. राज्यात ३७ एकलव्य मॉडेल निवासी शाळा आहेत. तेथे ११ हजार ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांमधून खेळाडू घडण्यास मदत होणार आहे.

आदिवासी विकास विभागाने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून गुणवंत विद्यार्थी घडवावेत. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी विजय किंवा पराभव न मानता खिलाडूवृत्ती दाखवावी. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा देत त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करोवत, असे आवाहन डाॅ. उईके यांनी केले. यावेळी खासदार डॉ. बच्छाव यांनीही मार्गदर्शन केले. आदिवासी विकास आयुक्त बनसोड यांनी प्रास्ताविकात या स्पर्धांची माहिती दिली.

दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या राज्यात ३७ एकलव्य मॉडेल निवासी शाळा आहेत. तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा होतात. तीन दिवस या स्पर्धा सुरू राहतील. या स्पर्धेत दोन हजार ७०४ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यात एक हजार ४२७ मुलांचा, तर एक हजार २७७ मुलींचा समावेश आहे. या स्पर्धा वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारात खेळविण्यात येणार आहेत. वैयक्तिक प्रकारात तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, मुष्टियुध्द, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक्स, ज्यूदो, टेनिस, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांदो, वेटलिफ्टिंग, कुस्ती (फ्री स्टाइल), योगा आदी १५ प्रकारात, तर सांघिक प्रकारात बास्केटबॉल, फुटबॉल, हॅण्डबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल आदी सात खेळांचा समावेश आहे.