जळगाव : सगळ्यात चांगली पिढी कोणाची निघत असेल तर ती मास्तरांची. आएएस, आयपीएस अधिकारी पाहिल्यावर शिक्षकांची मुले पुढे गेल्याचे दिसून येते. पुढाऱ्यांची मुले तशी कधीच ठिकाणावर नसतात. ज्यांची मुले चांगली निघाली त्यांचे कौतूक आहे, असा चिमटा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे शिक्षक दिनी लोकप्रतिनिधींना काढला.

जळगाव जिल्हा परिषदेतर्फे शिक्षक दिनी शुक्रवारी जिल्ह्यातील १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिस्तप्रिय आणि नेहमीच गंभीर असणाऱ्या शिक्षकांना आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत भाषण करून पोट धरून हसायला लावले. प्रत्येकाच्या जीवनात गुरुजींचा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा आहे. फाईव्ह जी आणि सिक्स जी आले तरी गुरुजींशिवाय विद्यार्थ्यांचे भवितव्य उजळणार नाही.

शिक्षकांनीही बदलत्या काळात अद्ययावत राहणे गरजेचे आहे. मराठी शाळांचे वैभव टिकवण्यासाठी पटसंख्या वाढविणे हीच शिक्षकांची खरी जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा गरीब आणि सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आधार असून, त्यांचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे. शिक्षक हा संपूर्ण समाजाचा आदर्श आहे. विद्यार्थ्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे पारितोषिक आहे. शिक्षक हा माणूस घडवणारा खरा शिल्पकार आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.

दरम्यान, आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत पालकमंत्री पाटील यांनी जुन्या काळातील आणि नव्या काळातील शिक्षकांच्या आचरणाची तुलना केली. पूर्वीचे शिक्षक रुबाबदार असत. त्यांच्या एका कटाक्षाने संपूर्ण वर्ग शांत होत असे. मात्र, आजचे शिक्षक दहा खिशांचे असतात. त्यांना कोणीच घाबरत नाही, असा टोला हाणून त्यांनी सभागृहात हशा पिकवला. संपत्ती कोटीमध्ये मोजण्यापेक्षा तुमची अपत्ये कशी निघाली, हे जास्त महत्वाचे असते. भरपूर पैसा आहे आणि मुलगा सायंकाळी दारू पिऊन रिंगण घालतो. तेव्हा काय करायचे त्या पैशांचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विधानसभेतील २८८ पैकी २१२ आमदारांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. मी देखील त्याला अपवाद नाही. सुदैवाने शिक्षकांना तसे कोणतेच आजार नसतात. कारण, त्यांचे आयुष्य अतिशय शिस्तबद्ध असते, असे सांगून त्यांनी शिक्षकांच्या निरोगी जीवनशैलीचे कौतूक केले. जिल्हा नियोजन समितीमधून जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळांना संरक्षण भिंती बांधून दिल्या आहेत.

आता सुमारे १४ कोटी रुपयांच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. याशिवाय लवकरच ६६ वर्ग खोल्यांचे नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. बाला उपक्रमांअंतर्गतही जिल्ह्यातील ४८ शाळांची निवड करण्यात येणार असून, त्यास सुद्धा लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना दिली.