नंदुरबार : विधानसभा निवडणुकीत मुलगी आणि भाऊ यांना शिंदे आणि अजित पवार गटाच्या विरोधात उतरविणारे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना राजकीय विश्वासाची भाषा करण्याचा हक्क काय, असा प्रश्न शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या अनुषंगाने अक्कलकुवा येथे झालेल्या मेळाव्यात भाजपचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यावर टीका केली होती. पक्षश्रेष्ठींकडे स्वबळावर निवडणूका लढण्याचा आग्रह करणार असल्याचे सांगितले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विरोधात काम केल्याने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न त्यांनी केला होता.

डाॅ. गावित यांच्या टिकेला आता शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उत्तर दिले आहे. ज्या आमश्या पाडवी यांनी लोकसभा निवडणूकींत डॉ. हिना गावित यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला, त्यांच्याविरोधात विधानसभा निवडणूकीत डाॅ. हिना गावित यांनाच अपक्ष लढविण्यात आले. मित्रपक्ष शिंदे गटासमोर स्वत:च्या मुलीला उभे करणारे डॉ. विजयकुमार गावित राजकीय विश्वासाबद्दल हास्यास्पद विधान करत असल्याचे रघुवंशी म्हणाले.

नवापूरमध्येही अजित पवार गटाचे उमेदवार भरत गावित यांच्यासमोर स्वत:चा भाऊ शरद गावित याला अपक्ष उभे केले. या राजकीय विश्वासघाताबाबत डॉ. विजयकुमार गावित काहीही बोलले नाहीत, असा प्रश्न रघुवंशी यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक कार्यकाळात देवेंद्र फडवणीस आणि एकनाथ शिंदे यांनी सांगूनही शिवसेनेला दूर सारुन कॉग्रेसच्या काही जिल्हा परिषद सदस्यांना हाताशी धरुन डॉ. विजयकुमार गावितांनी सत्तांतर करत जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन केली.

स्वत:च्या धाकट्या मुलीला सत्तेत बसविण्यासाठी वरिष्ठांचे आदेश झुगारुन कॉग्रेसशी हात मिळवणी करणाऱ्या डॉ. गावितांनी इथूनच प्रथम युतीमध्ये अविश्वासाला सुरुवात केल्याचा घणाघात रघुवंशी यांनी केला. पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये महायुतीत विरोधाचे पडसाद उमटले. आता डॉ. विजयकुमार गावित हे शिंदे आणि अजित पवार गटावर दाखवत असलेला राजकीय अविश्वास कितपत योग्य, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपपेक्षाही स्वत:ची गावित सेना कशी वाढेल, या प्रयत्नात डॉ. विजयकुमार गावित स्वत:च्या पक्षालाच संपवित असल्याचे चित्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या अनुषंगाने राज्यातील महायुतीच्या नेत्यांच्या निर्णयाकडे सर्वाचेच लक्ष लागून आहे. त्यांच्या निर्णयाप्रमाणे महायुती म्हणून लढायचे ठरल्यास त्यासाठी शिवसेना अनुकूल असल्याचे लोकसत्ताला रघुवंशी यांनी सांगितले.