नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाच्या विषयावर भाष्य केल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्याच्या मागणीसाठी बुधवारी रामकुंडात डुबकी मारत आंदोलन केले. नदी प्रदूषणमुक्त न झाल्यास प्रशासनाला शहरातील प्रत्येक नदीतील पाणी प्राशनासाठी दिले जाईल. तसेच प्रदूषित पाण्याने अंघोळ घातली जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

मनसेच्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी देशातील एकही नदी स्वच्छ नसल्याचा उल्लेख करुन कुंभमेळ्यात भाविकांनी स्नान केलेल्या नदीचे पाणी कोण प्राशन करेल, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही, असे प्रश्न उपस्थित केले होते. या घटनाक्रमानंतर मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींच्या नेतृत्वाखाली रामकुंड परिसरात आंदोलन करण्यात आले.

गोदावरी नदी स्वच्छता मोहिमेवर प्रचंड खर्च झाला. परंतु, ती स्वच्छ झाली नाही. प्रशासनाने या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आगामी कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीसह तिच्या उपनद्या प्रदूषणमुक्त करण्याची गरज आहे. प्रशासनाने कायमस्वरुपी नद्या स्वच्छ कशा राहतील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता सरचिटणीस पाटील यांनी मांडली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी रामकुंडात डुबकी मारून आंदोलन केले.

गोदावरीचे पाणी पिण्यायोग्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन याच प्रकारे केले जाईल. शहरातील प्रत्येक नदीतील पाणी प्रशासनाला पिण्यासाठी दिले जाईल, असे सांगण्यात आले. प्रदुषित पाण्याने अंघोळ घालण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, संदीप किरवे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे, सचिन सिन्हा, साधू-महंत आदी उपस्थित होते.