नाशिक महापालिकेचे १२ माजी नगरसेवक आणि नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यानंतर आता माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात आणून ठाकरे गटाला सुरुंग लावण्याची धडपड सुरू झाली आहे. त्या अंतर्गत नाशिकमधील माजी आमदार, माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असे जवळपास ५० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असून ते नागपूरला रवाना झाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ठाकरे गटाने पक्षांतर करणाऱ्यांच्या प्रभागात प्रभागनिहाय बैठकांना गती दिली असताना दुसरीकडे शिंदे गटाने फोडाफोडीला सुरूवात केली आहे.

हेही वाचा- नाशिक : शाखाध्यक्ष-इच्छुकांच्या चढाओढीत मनसेच्या राजदूताची नियुक्ती रखडली; अमित ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांशी संवाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेत फूट पडल्यानंतरही नाशिकमध्ये एकसंघ राहिलेल्या ठाकरे गटाला हादरे देण्यात शिंदे गटाला उशीरा का होईना, यश येऊ लागले आहे. नाराजांना हेरून त्यांना गळाला लावण्याचे काम शिंदे गटाने वेगात सुरू केले आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय पटलावर उलथापालथ सुरू आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार, माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदी ५० हून अधिक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी रवाना झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शहरातील काही पदाधिकारीही समाविष्ट होतील, असे चौधरी यांनी म्हटले आहे. नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संबंधितांचा प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाचे लक्ष आहे. नव्याने काही जण शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे गटाने पक्षांतर करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.