खा. राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ल्यास आम्ही सुरुंग लावला. देशपातळीवर काँग्रेसविरोधात वातावरण निर्माण केले आणि त्यांना घरी पाठविले. भाजपने शेतकरीविरोधी आणि चुकीची धोरणे राबविल्यास त्यांनाही घरी पाठविण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पिंपळगाव बसवंत येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीला गुरुवारी सुरुवात झाली. या बैठकीच्या उद्घाटन सोहळ्यात खा. शेट्टी यांनी दीड महिन्यांपूर्वी कांदा प्रश्नावरून स्वाभिमानीने छेडलेल्या आक्रमक आंदोलनामुळे पंतप्रधानांनी मांगीतुंगी येथील सोहळ्यास उपस्थित राहणे टाळल्याचे नमूद केले.
स्वयंवर लॉन्स येथे सुरू झालेल्या या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी सहभागी झाले आहेत. उद्घाटन सोहळ्यास वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, ज्येष्ठ शेतकरी नेते माधवराव मोरे, उत्तर महाराष्ट्र संघटक दीपक पगार, जिल्हा संघटक हंसराज वडघुले आदी उपस्थित होते. खा. शेट्टी यांनी सत्तेत असूनही शिवसेनेप्रमाणे विरोधकाची भूमिका वठविल्याचे पाहावयास मिळाले. महाआघाडीतील घटक पक्ष लाल दिव्याच्या अपक्षेने शांत असल्याचा आक्षेप घेतला जातो. परंतु, अशी मोटार मिळाली तरी चुकीचे काम झाल्याचे दिसल्यास त्याला लाथाडण्याची हिंमत स्वाभिमानीमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाआघाडी करताना नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बैठक झाली होती. त्यावेळी स्वाभिमानी संघटनेने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफा ठेवून हमी भाव पिकांना मिळावा, दुष्काळ निवारण योजना, नदी जोड प्रकल्प आदी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन घेऊन महाआघाडीत सहभाग निश्चित केला. परंतु, आजतागायत हे प्रश्न भाजप सरकारने सोडविले नसल्याची टीका त्यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना लढाऊ वृत्तीची आहे. त्यामुळे सत्तेत असूनही आम्ही गप्प नसल्याचे त्यांनी सूचित केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी निगडित दूध फेकण्याच्या आंदोलनानंतर
संघटना आंदोलक पदाधिकाऱ्यांच्या मागे उभी राहिली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी संघटना घेत आहे. शेतकऱ्यांनी काय पिकते, यापेक्षा काय विकते याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एका भागातील शेतकऱ्यांनी दुसऱ्या भागातील शेतकऱ्याचे ग्राहक व्हावे. एकमेकांचे ग्राहक झाल्यास काय विकले जाते याकडे प्राधान्यक्रमाने लक्ष दिले जाईल, असेही शेट्टी यांनी नमूद केले. दरम्यान, शुक्रवारी राज्य कार्यकारिणीची फेररचना व जिल्हा, राज्य कार्यकारिणी पदाधिकारी निवड, पक्ष विस्ताराबाबत उपस्थितांशी चर्चा होईल.
तसेच टेहेरे व खेरवाडी येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांना मानवंदना देऊन शहीद ज्योतीची शोभायात्रा पिंपळगाव परिसरात काढण्यात येणार आहे. सायंकाळच्या सत्रात खा. शेट्टी, खोत, जानकर यांची जाहीर सभा होईल. त्याचवेळी ज्येष्ठ शेतकरी नेते माधवराव मोरे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.