नाशिक : मुंबईतील मराठी भाषा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वप्रथम नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र मेळावे घेण्यास सुरुवात केली. आता त्यापुढे पाऊल टाकत शुक्रवारी नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांनी संयुक्तपणे नाशिकमधील गुन्हेगारी, अमली पदार्थ, खड्डेमय रस्ते अशा विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त मोर्चा काढला. या मोर्चात ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि मनसेकडून बाळा नांदगावकर यांनी भूमिका मांडली. दोन्ही नेत्यांनी सत्ताधारी महायुतीवर टिकास्त्र सोडले.
खासदार संजय राऊत यांनी तर नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले याचे उत्तर नाशिकमध्ये असल्याचे सांगितले. जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरतो तेव्हां नेपाळ होते, बांगलादेश होते. हा इशारा देण्यासाठीच नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. शिंदे गट मुंबई पोलीस आयुक्तांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भेटले. मी महाराष्ट्राचा नेपाळ होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. अरे पण, नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले याचे उत्तर नाशिकमध्ये असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.
पंचवटीत काही दिवसांपूर्वी राहुल धोत्रे या युवकाची हत्या झाली. या हत्या प्रकरणातील संशयित भाजपचा माजी नगरसेवक उध्दव निमसे हा फरार आहे. या विषयाचाही राऊत यांनी उल्लेख केला. राहुलची हत्या देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता, गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्याने केली आहे. उद्धव निमसे कसा सापडत नाही, असा प्रश्न त्यांनी केला. भाजपचा एक नगरसेवक हत्या करून फरार होतो. त्याला कोण वाचवत आहे, हे जर राज्याच्या गृहमंत्र्यांना माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात, अशी टीका राऊत यांनी केली.
यापुढे नाशिकसह राज्यातील सर्व कार्यक्रम ठाकरे गट आणि मनसे यांच्या वतीने संयुक्तपणे होणार आहेत. दोन भाऊ, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले आहेत. मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे कुळ आणि मूळ एकच असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी मनसेचे बाळा नांदगावकर यांनी, आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
सन्माननीय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र उतरले तर तुमचे काय होईल याचा विचार तुम्हीच करा, अशी टीका केली. नाशिकला दत्तक घेतले होते. नाशिकचा कोणता विकास झाला, असा प्रश्न नांदगावकर यांनी केला. नाशिककरांनी त्यांच्यावर विश्वास टाकला की काहीतरी चांगलं होईल. पण, काहीच झाले नाही, असे नांदगावकर यांनी सांगितले. या संयुक्त मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.