लोकसत्ता वार्ताहर

धुळे: थकीत पगार न झाल्याने बुधवारी संजय अग्रवाल या कर्मचाऱ्याने महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून अग्रवाल यांना ताब्यात घेतले. या प्रकारानंतर अनुदान येताच थकीत पगार देण्याचे आश्वासन आयुक्त देविदास टेकाळे यांनी दिले. 

अग्रवाल यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याचे कळताच आयुक्त टेकाळे यांनी अग्रवाल यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी त्यांना आपल्या दालनात बोलाविले. यावेळी महापौर प्रतिभाताई चौधरी उपस्थित होत्या. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार अक्षय्यतृतीयासारखा सण तोंडावर आलेला असताना कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार मिळालेला नाही.

आणखी वाचा- धुळे: मेणबत्ती कारखाना दुर्घटना प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासकीय अनुदान आले नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. दुसरीकडे मार्च महिन्यात कर वसुली मोहिमेतून कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. या रकमेतून पगार देण्याची मागणी अग्रवाल यांनी केली होती. १९ एप्रिलपर्यंत पगार न झाल्यास आयुक्तांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमिवर पगार न मिळालेले सर्व २१ कर्मचारी आयुक्तांच्या दालनासमोर उपस्थित होते. इशाऱ्याप्रमाणे अग्रवाल यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, आपण केलेला प्रकार चुकीचा असल्याची आपणास जाणीव असून यामुळे आपण आयुक्त तसेच पोलीस प्रशासनाची माफी मागितली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.