त्र्यंबकरोडवरील सातपूर परिसरातील इएसआय हॉस्पिटल आवारात मध्यरात्री १२ नंतर एका २८ वर्षीय तरुणाची संशयितांनी दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातपूर येथील इएसआय हॉस्पिटल आवारात आज (बुधवार) सकाळी लक्ष्मण विटकर (वय २८, रा. सातपूर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेचे वृत्त समजताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत लक्ष्मण हा गेल्या दीड ते दोन वर्षांपासून शहरामध्ये रिक्षा चालवत होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने हा व्यवसाय बंद केला. सध्या मजूर म्हणून तो काम करत होता. त्याच्यामागे पत्नी, लहान मुलगा, आई, भाऊ व वहिनी असा परिवार आहे. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्यासह न राहता तिच्या माहेरी राहत आहे. त्याची आई, भाऊ व वाहिनी श्रमिक नगर येथे स्वतंत्रपणे वास्तव्यास आहेत. सातपूरमधील वडारवाडी भागातील जेपीनगरमध्ये तो सध्या एकटा राहत होता. रात्री १२ च्या सुमारास हॉस्पिटल आवारात तो त्याच्या मित्रांसह एका व्यक्तीचा वाढदिवस साजरा करत होता. या पार्टीदरम्यान याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशनही करण्यात आले. रात्री १२ नंतर अज्ञात चार ते पाच संशयितांनी लक्ष्मणच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असता याठिकाणी मद्याच्या बाटल्या व केक आढळून आले.
घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करून हा मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरु आहे.

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder at satpur nashik crime
First published on: 29-03-2017 at 15:59 IST