नाशिक – शहरातील हत्यासत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील दत्त मंदिर बस थांबा चौफुलीजवळ मंगळवारी दुपारी पाऊस सुरू असताना एका वृध्दाची लाकडी दंडुक्याचे प्रहार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरात सातत्याने होणाऱ्या हत्या रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. शहरात यावर्षी पहिल्या पाच महिन्यात हत्यांची संख्या २५ पर्यंत गेली आहे. हत्या झालेल्यांमध्ये सराईत गुन्हेगारांप्रमाणेच सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. ज्यांचा गुन्हेगारी विश्वाशी संबंध नाही. मात्र क्षणिक वादातून हत्यार उचलत टोकाचे पाऊल गाठणारे आहेत. त्रिमूर्ती चौकाजवळील दत्त मंदिर बस थांब्यालगत देशी दारुचा अड्डा आहे. उंटवाडी परिसरात राहणारे गणपत घारे (५०) हे या ठिकाणी नशेत ये-जा करणाऱ्यांना लाकडी दंडुक्याने मारत होते. काही जण हा मार चुकवत होते. तर काहींना दंडुक्याचा प्रसाद मिळत होता. त्याचवेळी दारूच्या नशेत समोद कौर (३५) हा आला. त्यालाही लाकडी दंडुक्याचा फटका बसला. त्यामुळे संतप्त कौरने दंडुका हातात घेत घारे यांच्यावर दांडक्याने प्रहार केले. घाव वर्मी बसल्याने घारे यांचा जागीच मृत्यू झाला.
दोघांमध्ये हाणामारी सुरु असताना रिक्षाचालक, दुचाकी वाहनचालक, पादचारी कोणीही त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट काही जण, भ्रमणध्वनीत घटनेचे चित्रण करीत राहिले. काही वेळाने एकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ताेपर्यंत उशीर झाला होता. याबाबत अंबड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित कौर याला ताब्यात घेतले. या प्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.