सिंहस्थानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असला तरी शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा धुडगूस मात्र सुरू आहे. किरकोळ वादातून व्यंकटेश मोरे व त्याच्या साथीदारांनी दुसऱ्या गटावर तीक्ष्ण हत्यारांनी चढविलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर चार युवक जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ठक्कर बझारजवळील हॉटेलच्या जिन्यात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. राहूल जाधव असे या मृत तरुणाचे नाव आहे. संशयितावर याआधी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मोहन चांगले खून प्रकरणात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. या घडामोडींमुळे टोळी युध्दाने पुन्हा डोके वर काढल्याचे अधोरेखीत झाले आहे.

काही वर्षांपूर्वी टोळक्यांचा धुडगूस, वाहनांची जाळपोळ, महिलांच्या अंगावरील दागिने लंपास करणे आदी घटनांमुळे गुन्हेगारांचे शहर अशी ओळख बनलेल्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी गुन्हेगार आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना धडा शिकवत स्थिती बरीच नियंत्रणात आणली होती. तथापि, आयुक्त पदावरून त्यांची बदली झाल्यानंतर स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाल्याचे दिसत आहे.
मंगळवारी मध्यरात्री घडलेली घटना त्याचे उदाहरण म्हणता येईल. या प्रकरणी हिरालाल ठोंबरे यांनी तक्रार दिली. रात्री एकच्या सुमारास किरण कुलकर्णी, राहूल उर्फ गुणाजी जाधव, सागर परदेशी, किशोर नागरे व विकी दिवे हे हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले होते. यावेळी किरण भ्रमणध्वनी करण्याच्या बहाण्याने बाहेर गेला असता तिथे व्यंकटेश व परेश मोरे आणि त्यांचे चार ते पाच साथीदार धडकले.
मागील भांडणाचा राग मनात धरून त्यांनी तीक्ष्य हत्यारांनी हल्ला चढविला. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. डोक्याला गंभीर मार बसल्याने राहूल जाधवचा मृत्यू झाला तर अन्य जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या प्रकरणी व्यंकटेश मोरे, परेश मोरे व त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्याविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मोहन चांगले हत्या प्रकरणात व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल झाला होता. त्या खटल्यातुन त्यांची निर्दोष मुक्तता झाली. त्याच्यावर लुटमार, हाणामारी, प्राणघातक हल्ला, दरोडा आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले.