नाशिक : जिथे ज्याची ताकद, तिथे त्या पक्षाच्या उमेदवारामागे सर्वांनी उभे रहायचे, असे सूत्र स्थानिक पातळीवर मनसेला सामावून आकारास आलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी निश्चित केले आहे. या अनुषंगाने सर्वपक्षीय नेते संयुक्त दौरा करणार आहेत.
जिल्ह्यात भगूर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवड, इगतपुरी, ओझऱ, पिंपळगाव बसवंत आणि त्र्यंबकेश्वर. या ११ नगर परिषदा आणि नगर पंंचायतींमध्ये २६६ जागांसाठी निवडणुका होत आहेत. या ११ ठिकाणी थेट अध्यक्षांची निवड जनतेतून होणार आहे. याआधी बहुसंख्य ठिकाणी एकसंघ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतु, दोन्ही पक्ष फुटल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. नगर परिषद आणि नगर पंचायतीत अर्ज भरण्यास सुरूवात झाली असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनसे, माकप, भाकप आदी पक्षांच्या बरोबरीने एकत्रितपणे ही निवडणूक लढण्याची घोषणा केली.
विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत जागा वाटपात चांगलीच रस्सीखेच झाली होती. नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या काँग्रेसची दावेदारी असणाऱ्या दोन्ही जागा अनुक्रमे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाने स्वत:कडे खेचून घेतल्या होत्या. इतर काही ठिकाणी तोच कित्ता गिरवला गेला. तीन प्रमुख पक्षांमध्ये चढाओढ असताना आता मनसेच्या रुपाने चौथा भागीदार आघाडीत जोडला गेला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार, हा प्रश्न आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते यांनी भाष्य केले. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कुठलेही मतभेद होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
जिथे ज्या पक्षाची शक्ती आहे, सक्षम उमेदवार व निवडून येण्याची क्षमता असेल, तिथे इतर पक्ष त्याच्या पाठिशी उभे राहतील. गतवेळी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड अशा काही ठिकाणी एकसंघ शिवसेनेचे वर्चस्व होते. काही ठिकाणी पेच निर्माण झाल्यास तिथे उपनगराध्यक्षपद देण्यासारखी तडजोड केली जाईल. स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी मंगळवारपासून चारही पक्षातील नेत्यांचे संयुक्त दोरे सुरू होणार असल्याचे गिते यांनी नमूद केले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, माकपचे डॉ. डी. एल. कराड, काँग्रेसचे राहुल दिेवे, भाकपचे राजू देसले आदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली.
ठाकरे गटामुळे मनसे ताटकळली
विरोधी पक्षांनी मनसेला बरोबरीने घेत नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली. यानिमित्ताने नाशिकमध्ये महाविकास आघाडीने मनसेला सामावून घेतल्याचे चित्र समोर आले. परंतु, मनसेही महाविकास आघाडीत जाण्यात तितकीच उत्सुक होती. या महत्वाच्या घोषणेची जबाबदारी जणू मनसेने शिरावर घेतल्याचे दिसत होते. महाविकास आघाडीच्या स्थानिक प्रमुख नेत्यांना एकत्रित करताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांची दमछाक झाली. सकाळी दहा वाजता घोषणा केली जाणार होती. परंतु, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही पदाधिकारी विलंबाने पोहोचल्याने घोषणेला अर्धा तास विलंब झाला. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी सर्वात शेवटी आले. ते येईपर्यंत पदाधिकारी ताटकळत होते.
