नाशिक : दृष्टीबाधित बालकांसाठी काम करणाऱ्या येथील ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या संस्थेच्या वतीने बदलती शैक्षणिक पद्धत पाहता काळानुरूप पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नव्या शैक्षणिक वर्षांत संस्थेच्या वतीने सातपूर परिसरातील अंधशाळेचे मार्गक्रमण ‘डिजिटल स्कूल’कडे होणार असून ई-लायब्ररीही या ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी दिली.

 नव्या शैक्षणिक वर्षांचा आरंभ झाला असला तरी विशेष बालकांच्या शाळांचे वेळापत्रक, नियोजन वेगळे असते. येथील सातपूर परिसरात दृष्टीबाधित बालकांसाठी शाळा सुरू आहे. बऱ्याचदा पालक विशेष बालकाला त्यांच्यासाठी असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास नाखूश असतात. बालकात व्यंग असले तरी त्याची वाढ, वर्तणूक ही सर्वसामान्य बालकांसारखी व्हावी, तो अन्य सामान्य बालकांमध्ये खेळावा, त्यांच्यासोबत शिकावे, अशी पालकांची इच्छा असते. विशेष शाळांमध्येही अशा बालकांच्या गरजा लक्षात घेता त्यांना वेगवेगळय़ा सुविधा देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न होतो. दृष्टीबाधित बालकांचे शिक्षण ब्रेल लिपीवर आधारित असते. हे प्रत्येकाला येतेच असे नाही. परीक्षाकाळात अशा बालकांना लेखनिक मिळवताना अडचणी येतात. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो. या पार्श्वभूमीवर नॅबच्या वतीने नव्या शैक्षणिक वर्षांत शाळेच्या आवारात ई-लायब्ररी तसेच डिजिटल स्कूल सुरू करण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग नाशिक येथील नॅब संकुलात होत आहे.

 सापुतारा परिसरातील एका अंधशाळेचा अभ्यास करून पुढील नियोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने संस्थेच्या वतीने कार्यशाळा घेत त्यात अंध विद्यार्थ्यांना ई-लर्निग कसे करता येईल, शिक्षकांची भूमिका काय असेल, संस्थाचालकांची तयारी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. मात्र ही अनोखी डिजिटल शाळा सुरू होण्यासाठी कीबोर्ड, अत्याधुनिक भ्रमणध्वनीची गरज लागणार आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी केले.

इच्छुकांसाठी आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’च्या वतीने अंधशाळा, महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेणारे दृष्टीबाधित विद्यार्थी यांच्यासाठी ई-लायब्ररी सुरू करण्यात येत आहे. याचा उपयोग दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी होणार आहे. ई-लायब्ररीकरिता आभासी प्रणालीद्वारे किंवा ई-बुकद्वारे पाचवीपासून ते पदव्युत्तपर्यंत अभ्यास करण्यासाठी दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना अत्याधुनिक भ्रमणध्वनी किंवा कीबोर्ड देणगी स्वरूपात द्यावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुकांनी हे साहित्य संस्थेच्या कार्यालयात जमा करावे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२५३-२३५३५७८, २३६४३७८, ८८०५३२५००० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.