पावसाची संततधार

‘गुलाब चक्री’वादळाचे परिणाम मंगळवारी जिल्ह्यातील अनेक भागात पाहायला मिळाले.

गोदावरीच्या पातळीत मंगळवारी पुन्हा वाढ झाल्याने नदीकाठच्या दुकानदारांची टपऱ्या हलविण्यासाठी लगबग सुरू झाली. (छाया-यतीश भानू)

नांदगाव, दिंडोरीला पावसाने झोडपले; पांझणच्या पुरात युवकाचा मृत्यू 

नाशिक : ‘गुलाब चक्री’वादळाचे परिणाम मंगळवारी जिल्ह्यातील अनेक भागात पाहायला मिळाले. नांदगाव, िदडोरीसह आसपासच्या भागास मुसळधार पावसाने

झोडपले. नांदगावमधील काही भागांचा संपर्क पुरामुळे तुटला. पांझण नदीच्या पुलावरून एक युवक वाहून गेला. गोदावरी नदीत वाहून जाणाऱ्याला वाचविण्यात यश मिळाले. धरण  क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पालखेडमधून विसर्ग करण्यात आला. िदडोरी आणि निफाड तालुक्यातील कादवा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘गुलाब चक्री’वादळाच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात २९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदगाव, मालेगाव, बागलाण , सुरगाणा येवला तालुक्यांत त्याचा जोर अधिक राहिला. तुलनेत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तुरळक पाऊस होता. मंगळवारी पहाटेपासून नाशिक, िदडोरी, नांदगाव व आसपासच्या भागात पावसाने  जोर पकडला. नांदगावला अतिवृष्टीचा तडाखा बसला. याआधी दोनवेळा पावसाने तालुक्यात मोठे नुकसान केले आहे. त्याची पुनरावृत्ती झाली. पुरामुळे काही भागांशी संपर्क खंडित झाला. पांझण नदीच्या पुलावरून निलेश जयप्रकाश परदेशी (३२, कळमदरी) हा युवक वाहून गेला. त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती स्थानिक यंत्रणेकडून देण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले.

पहाटेपासून नाशिक शहर व परिसरात संततधार सुरू झाली. अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेऊन गंगापूर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून तीन हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ झाली. दुपारी तीन वाजता गोदा पात्रातून होळकर पूल येथे सात हजार ८०० क्युसेकने प्रवाह वाहत होता. काठालगतच्या

लहान टपऱ्या हलविण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ उडाली. िदडोरी व परिसरात मुसळधार पाऊस झाला. संततधारेमुळे पालखेड धरणातून ८७४ क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. कादवा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या शिवाय दारणामधून ५५०,  वालदेवी १८३, काश्यपी ३००, नांदुरमध्यमेश्वरमधून ७९२४ क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. गुलाब चक्रीवादळाने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा

प्रभाव पुढील ४८ तास दिसण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

गोदावरीत वाहून जाणाऱ्यास वाचविले दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीच्या प्रवाहात पोहण्याचा प्रयत्न एका युवकाच्या जिवावर बेतला असता. दुपारी त्याने गोदापात्रात उडी घेतली. मात्र, प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो वाहत गेला. ही बाब काठावरील काही जणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उडय़ा मारून संबंधितास काठावर आणले. गंभीर अवस्थेतील या युवकास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मधुबन कॉलनीतील तो रहिवासी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. त्याचे नाव समजू शकले नाही. या घटनेबाबत अग्निशमन विभागही अनभिज्ञ होता. नदीपात्रात उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासन वारंवार करीत असले तरी अनेकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nandgaon dindori was lashed by rains ssh

ताज्या बातम्या