नंदुरबार – लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देणाऱ्या राज्य शासनाकडे राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडे पालकत्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू आणि मार्गदर्शकांना तब्बल आठ वर्षांपासून त्यांच्या पुरस्काराच्या बक्षीसाची रक्कम देण्यासाठी पैसे नसल्याचे उघड झाले आहे. पुरस्कारप्राप्त मार्गदर्शक आणि खेळाडूंना प्रत्येकी १० हजार रुपये रोख, १५०० रुपयांचे स्मृतीचिन्ह आणि २५० रुपयांच्या प्रमाणपत्रांसाठी क्रीडा खात्याकडे आठ वर्षांपासून पैसेच असू नये, यापेक्षा दुर्देव ते काय, अशी प्रतिक्रिया खेळाडुंकडून व्यक्त केली जात आहे.

राज्य शासन मोठा गाजावाजा करुन दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक ,खेळाडू तसेच अपंग खेळाडूंची निवड करुन त्यांना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करते. यात मार्गदर्शक, संघटक, आणि खेळाडूंसाठी रोख १० हजार, स्मृतिचिन्हासाठी १५०० रुपये आणि प्रमाणपत्रासाठी २५० रुपयांची तरतूद क्रीडा विभागाने केली आहे. परंतु, २०१८ पासून निवड झालेल्या जिल्ह्यातील मार्गदर्शक, संघटक आणि खेळाडूंना त्याच्या कामगिरीबद्दल बक्षीसांची रक्कमच मिळाली नसल्याची अत्यंत विदारक परिस्थिती आहे.

 २०१८ मध्ये दोन, २०२० मध्ये तीन, २०२१ मध्ये चार, २०२२ मध्ये चार तर २०२३ मध्ये चार अशा १८ क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू , गुणवंत अपंग खेळाडूंना जिल्हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यातील करोना काळात आलेल्या निधीचा वापर न झाल्याने तो परत गेला. तो निधी परत मिळविण्यासाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून  क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांच्याशी पत्रव्यवहार सुरु आहे. त्यात २०२३ या वर्षासाठी खेळांडूचे पैसे प्राप्त झाले असले तरी वरील १५ पुरस्कारार्थींचे एकत्रीत एक लाख ६४ हजार ५०० रुपये इतकी बक्षीसाची सन्मान रक्कम क्रीडा संचालनालयाकडून येणे बाकी आहे. याकरिता २०२० पासून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा देखील केला जात आहे. विशेष म्हणजे नंदुरबारच नव्हे तर, राज्यभर जिल्हा  क्रीडा पुरस्कारांच्या बक्षीस रकमेची यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

त्यामुळे खेळाडूंना स्वांतंत्र्यदिन, प्रजाकसत्ताक दिनासारख्या महत्वाच्या दिवशी थेट मंत्र्यांकडून पुरस्कार तर दिला जातो. परंतु, आठ वर्षांपासून बक्षीसांची रक्कमच न देणे म्हणजे गुणवंत खेळाडू , संघटक आणि क्रीडा मार्गदर्शकांची ही सरकारने केलेली थट्टाच म्हणावी लागेल. त्यामुळे आता नव्यानेच कारभार हाती घेतलेले क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे याकडे लक्ष देतील. खेळाडू , मार्गदर्शकांच्या हा सन्मानाचा प्रश्न मार्गी लावतील का, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत

गेल्या अनेक वर्षांपासून थखीत जिल्हा क्रीडा पुरस्कारांच्या बक्षीस रकमेविषयी २०२० पासून सातत्याने क्रीडा आयुक्त स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. तोपर्यत क्रीडा परिषदेच्या  शिल्लक असलेल्या पैशातून खेळाडू, क्रीडा मार्गदर्शकांच्या सन्मानाची ही रक्कम देवून नंतर वरिष्ठ स्तरावरुन निधी प्राप्त झाल्यानंतर हे पैसे पुन्हा क्रीडा परिषदेमध्ये समायोजित करण्याचे नियोजन करण्यात आले असून एक- दोन दिवसात सन्मानार्थींची पुरस्कार रक्कम त्यांना देण्यात येईल.- सुनंदा पाटील (जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार)