नंदुरबार : महामार्ग पोलिसांच्या अवैध वसुली विरोधात एका मालमोटार चालकाच्या झालेल्या उद्रेकानंतर या प्रकरणावर नंदुरबार जिल्ह्यातील महामार्ग पोलिसांनी बोलणे टाळले आहे. मंगळवारी कोंडाईबारीजवळ चार ते पाच तास झालेल्या आंदोलनानंतर विसरवाडी पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षकांना जावून हे प्रकरण निस्तारावे लागले. मुळातच महामार्ग पोलिसांचे प्रभारी अधिकारी गायब असतांना नंदुरबार पोलिसांनी या मालमोटार चालकांची समजूत काढली.परंतु, अवैध वसुलीबाबतच्या आरोपांचे काय, हा प्रश्न ऩिरुत्तरीतच आहे.

नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात महामार्ग पोलिसांची चौकी आहे. या ठिकाणी पोलिसांकडून मालमोटार चालकांकडून २० ते ३० रुपये अवैधपणे घेतले जात असल्याचे आरोप वारंवार होतात. अशाच वादातून मंगळवारी एका चालकाने अवैध वसुलीविरोधात आत्महत्या करण्याची धमकी देत आंदोलनात्मक पवित्रा घेतला. या चालकाने आपली मालमोटार महामार्गावर आडवी लावली. मालमोटारीवर चढून आपल्या गळ्यात दोरी अडकवून पोलिसांच्या मनमानीविरोधात आंदोलन सुरु केले. या आंदोलनस्थळी काही अन्य मालमोटार चालकदेखील जमा झाले. त्यांनीही महामार्ग पोलिसांवर अवैधपणे पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप केला. याठिकाणी तैनात असलेले महामार्ग पोलीस स्थानिक मालमोटार वगळता बाहेरच्या चालकांकडून रोज येता-जाता २० ते ३० रुपयांची मागणी करतात. ही वसुली पोलिसांच्या वतीने खासगी व्यक्तींकडून केली जात असून त्यांना नाव, बिल्लाबाबत विचारणा केल्यास ते दंड (चलान) करतात. अथवा वरिष्ठांशी बोला, अशाप्रकारे त्रास देत असल्याचे अनेक मालमोटार चालकांनी सांगितले.

चार ते पाच तास आंदोलक मालमोटार चालकाने यंत्रणांना वेठीस धरल्याने महामार्गावर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. नंदुरबार पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनंतर विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नरेंद्र साबळे हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यानी आंदोलक मालमोटार चालकाशी संवाद साधत त्याचे म्हणणे ऐकून घेतले. आपणास दिलेले चलान वसूल न करता या ठिकाणाहून जाऊ द्यावे, ही त्याची मागणी पोलिसांनी मान्य केल्याने तो चार ते पाच तासांनंतर मालमोटारीच्या टपावरुन खाली उतरला. महामार्गावर आडवी केलेली मालमोटार काढून तो त्याच्या नियोजित स्थळाकडे मार्गस्थ झाला.

परंतु, महामार्ग पोलिसांच्या विरोधात झालेल्या या उद्रेकानंतरही मालमोटार चालकांनी महामार्ग पोलिसांविरोधात केलेल्या वसुलीच्या आरोपांचे काय, हा प्रश्न निरुत्तरीत राहिला आहे. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक हे आंदोलन मिटविण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या चौकीवर पोहचले असता एक पोलीस उपनिरीक्षक आणि काही पोलीस कर्मचारी वगळता याठिकाणी कोणीही नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महामार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे आंदोलन सुरु असतांना चार ते पाच तास महामार्ग ठप्प झाले असतांना होते तरी कुठे, हा प्रश्नही विचारला जात आहे.