नंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहचविणे हे प्रशासनासमोर कायमच आव्हान राहिले आहे. अनेक आदिवासी वाड्या,पाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ताही नाही. कित्येक वर्षानंतरही या भागात अशी स्थिती असताना सरदार सरोवर जलाशयाशेजारील सातपुडा पर्वतरांगत वसलेल्या आदिवासी वाड्या-पाड्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक दायित्व निधीअंतर्गत नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाला बोट रुग्णवाहिका (बोट ॲम्ब्युलन्स) मिळाली आहे. सरदार सरोवर जलाशयाच्या काठावर उभी असलेली ही रुग्णवाहिका शनिवारी अचानक बुडणे सुरु झाले. आणि आरोग्य प्रशासनासमोर या रुग्णवाहिकेस वाचवावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी मग हरतऱ्हेने प्रयत्न सुरु झाले. या प्रयत्नात अनेकांचा सहभाग राहिला.

सरदार सरोवर जलाशयाशेजारील सातपुडा पर्वतरांगत वसलेल्या आदिवासी वाड्या-पाड्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी पॉवर ग्रीड काॅर्पोरेशनने सामाजिक दायित्व निधीतून बोट रुग्णवाहिका नंदुरबारच्या आरोग्य विभागाला दिली आहे. शनिवारी सायंकाळी सरोवराच्या काठाशी उभी असलेली बोट रुग्णवाहिका बुडत असल्याची बातमी सर्वप्रथम लोकसत्ताने दिली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह यंत्रणेकडून रुग्णवाहिकेला पूर्णपणे बुडण्यापासूव वाचविण्याचे प्रयत्न सुरु झाले. जलाशयात असलेल्या छोट्या क्रेन रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी निरुपयोगी ठरल्याने वडोदरा येथून मोठी क्रेन मागविण्यात आली. सोमवारी ही क्रेन केवडिया कॉलनी परिसरात पंक्चर झाल्याने निर्धारित वेळेऐवजी ती घटनास्थळी सोमवारी रात्री आठ वाजता पोहचली. त्यानंतर जवळपास आठ तासाच्या प्रयत्नानंतर मंगळवारी पहाटे पाच वाजता रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले.

रुग्णवाहिकेचा जवळपास ३० टक्के भाग जलाशयात बुडाला होता, असा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे. रुग्णवाहिकेची कुठलीही हानी झाली नसल्याची माहिती अतिरीक्त आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी लोकसत्ताला दिली आहे. रुग्णवाहिकेचा इंजिनकडील भाग पाण्यात बुडाला होता. त्यामुळे तांत्रीक तपासणी करुन वापराबाबतचा निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नर्मदा काठावरील आरोग्य सेवेची काळजी घेण्यासाठी या बोट रुग्णवाहिकेसह चार रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यापैकी दोन धडगाव तालुक्यातील रोषमाळ आणि बिलगाव येथे तर दोन बोट रुग्णवाहिका अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली आणि चिखली येथे आहेत. सद्यस्थितीत अक्कलकुवा तालुक्यातील दोनही बोट रुग्णवाहिका तात्पुरत्या स्वरुपात बंद आहेत. त्यामुळे याठिकाणच्या आशासेविका तसेच इतरांना वाड्या, पाड्यांना वारंवार भेटी देवून आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली