नंदुरबार – जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसाने कापूस, मिरची , बाजरी, कांदा, भात, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी करुन ठेवलेला भात शेतात साचलेल्या पाण्यात तरंगत असल्याचे चित्र आहे.
ऐन दिवाळीत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पावसामुळे संकटाचे काळे ढग दाटले. प्रशासनाने पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवित जिल्ह्याला यलो अलर्ट दिला होता. अशातच दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे. शेतातील कापूस, मिरची , बाजरी, कांदा, भात, मका पीक आडवे झाले. दिवाळीमुळे बाजार समित्या बंद असल्याने मिरची पिकाची तोड थांबली होती. दिवाळीत मजुर मिळत ऩसल्याने कापूस वेचणीदेखील झालेली नव्हती. त्यामुळे शेतात उभे असलेले मिरची आणि कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, नंदुरबार जिल्ह्यातील रनाळे परिसरात २० सप्टेंबर रोजी वादळी पावसाने नुकसान झाले होते.
शेतातील पिकांचे पंचनामे होत नसल्याने पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या आणि उर्वरीत पिकांची काढणीच केलेली नव्हती. अशातच पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आदेश दिल्यानंतरही कृषी विभागाने अद्यापपर्यत पंचनामे केले नसल्याने शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या पिकांचेदेखील या पावसात नुकसान झाल्याने रनाळे परिसरातील शेतकरी कृषी विभागाच्या कारभारावर चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामुळेच आसमानी संकटाबरोबर प्रशासनाच्या आडमुठे भूमिकेच्या सुलतानी संकटाचा दुहेरी मार या परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
नवापूर तालुक्यात पावसाने अक्षरश: थैमान केले असून शेतात कापून ठेवलेले भाताचे पीक शेतात साचलेल्या पाण्यात तरंगत आहे. नवापूर तालुक्यातील चौकी, मोरकरंजा, पानबारा, सोनखांब, तिळासर, जामनपाडा , खेकडा, झामणझर, कारेघाट, लक्कडकोट, गडद, आमपाडा आदी भागांतही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने भात, सोयाबीन, तूर, मका पिकाला फटका बसला आहे. या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने याची तातडीने दखल घेऊन, झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. झामनझर परिसरात कापणी करून ठेवलेल्या भात शेताला तलावाचे स्वरूप आले आहे
